देशात दिवसभरात करोनाचे २,६१,५०० रूग्ण

देशात करोनाचा वेगाने फैलाव सुरू असून, रविवारी दैनंदिन रुग्णसंख्या आणि करोनाबळींच्या संख्येने नवा उच्चांक नोंदवला. गेल्या २४ तासांत देशात करोनाचे २,६१,५०० रुग्ण आढळले, तर १,५०१ रुग्णांचा मृत्यू झाला.

देशात दैनंदिन रुग्णसंख्येत सलग ३९ व्या दिवशी वाढ नोंदविण्यात आली. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या १,४७,८८,१०९ वर पोहोचली असून, त्यातील १८,०१,३१६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उपचाराधीन रुग्णांचे हे प्रमाण १२.१८ टक्के आहे.

दिवसभरात देशात उच्चांकी करोनाबळी नोंदवण्यात आले असून, मृतांची एकूण संख्या १,७७,१५० वर पोहोचली आहे. एकूण बाधितांच्या तुलनेत हे प्रमाण १.२० टक्के आहे.

उत्तर प्रदेशात नवा उच्चांक; दिवसभरात ३०,५९६ रुग्ण उत्तर प्रदेशात गेल्या २४ तासांत ३०,५९६ रुग्ण आढळले. दिवसभरात राज्यात १२९ रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्णवाढ आणि करोनाबळींचा हा राज्यातील आतापर्यंतचा उच्चांक आहे.

बिहार, तमिळनाडूमध्ये रात्रीची संचारबंदी

बिहार आणि तमिळनाडूने रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. तमिळनाडूत यापुढे रविवारी संपूर्ण टाळेबंदी लागू करण्यात येणार आहे. तेथे गेल्या २४ तासांत दहा हजारांहून अधिक रुग्णनोंद झाली.