अमेरिकेतील जो बायडेन प्रशासनाने बहुतांश अमेरिकी लोकांना लशीची वर्धक मात्रा वीस सप्टेंबरपासून देण्याचे ठरवले आहे. पण मॉडर्ना लस ज्यांनी घेतली आहे त्यांच्यासाठी त्या लशीच्या माहितीच्या उपलब्धतेच्या प्रश्नामुळे गुंतागुंत निर्माण झाली आहे.

बायडेन प्रशासनाने गेल्या महिन्यात म्हटले होते, की लशीनंतर कालांतराने प्रतिकारशक्ती कमी होत असल्याने वर्धक मात्रेची गरज आहे. सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन तसेच अन्न व औषध प्रशासन या दोन संस्थांनी म्हटले होते, की दुसऱ्या मात्रेनंतर आठ महिन्यांनी वर्धक मात्रा देण्याची गरज आहे. परंतु या दोन संस्थांनी तिसऱ्या वर्धक मात्रेला परवानगी देण्याआधी मॉडर्ना लशीच्या उपलब्धतेबाबतची माहिती मिळण्यास विलंब होत असल्याने तिसऱ्या लशीच्या निर्णयावर स्वाक्षरी करण्यास विलंब लावला आहे. त्यामुळे वर्धक मात्रा लगेच सुरू न करता २० सप्टेंबरपासून सुरू होण्याची शक्यता आहे. मॉडर्नाने अन्न व औषध प्रशासन तसेच सेंटर फॉर डिसीज अँड कंट्रोल या संस्थांना अपुरी माहिती दिल्याने तिसऱ्या म्हणजे वर्धक मात्रेचा निर्णय लांबला आहे.

ब्राझीलमध्ये १ सप्टेंबरपासून सुरुवात

ब्राझीलमधील काही शहरात वर्धक मात्रा देण्याचे काम बुधवारपासून सुरू करण्यात आले असून अनेक लोक दुसऱ्या मात्रेच्या प्रतीक्षेत असतानाच वर्धक मात्रा सुरू करण्यात आली आहे.  ब्राझीलमध्ये जास्त संसर्गजन्य असलेला डेल्टा विषाणू पसरला असून ब्राझीलमधील रिओ डि जानिरो हे डेल्टाचे केंद्र बनले आहे. तेथे वयस्कर लोकांची संख्या अधिक असून बुधवारी या शहरात वर्धक मात्रा देण्यास सुरुवात झाली. ईशान्येकडील साल्वादोर व साओ लुईस या ठिकाणी सोमवारी वर्धक मात्रा सुरू करण्यात येणार आहे. ही शहरेही जास्त लोकसंख्येची आहेत. साव पावलो येथे ६ सप्टेंबरला वर्धक मात्रा सुरू करण्यात आली असून त्याच्या पुढील आठवड्यात देशभरातच ही मोहीम राबवण्यात येईल. या मात्रा मुख्यत्वेकरून वृद्धांना दिल्या जाणार आहेत. ब्राझीलमध्ये अनेकांचे पूर्ण लसीकरण झाले असले तरी तीस टक्के लोकांना अजून दुसरी मात्रा मिळालेली नाही.