कॅनडामध्ये आरोग्य अधिकाऱ्यांनी करोनाच्या डेल्टा विषाणूबाबत पुरेशी खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. पुरेशा प्रमाणात नागरिकांचे लसीकरण होण्याआधी आणि घाईने सध्या लागू केलेले निर्बंध मागे घेतल्यास चालू वर्षाच्या उन्ह्याळ्याअखेरीस देशात डेल्टामुळे करोनाची चौथी लाट येऊ शकते, असा इशारा कॅनडाच्या मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांनी दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. थेरेसा टाम यांनी म्हटले आहे की, देशात मोठ्या प्रमाणावर लसीकरण झाल्यामुळे रुग्णांचे मृत्यू कमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासण्याचे प्रमाणही कमी आहे. पण, रुग्णालये आणि आरोग्य यंत्रणेवर नव्याने ताण येऊ नये यासाठी लसीकरणाचे प्रमाण आणखी वाढविण्याची आवश्यकता आहे. किशोरवयीन मुलांना शक्य तितक्या लवकर लस दिली पाहिजे. त्यांच्यात लागण होण्याचे प्रमाण अन्य वयोगटांच्या तुलनेत कमी असले तरी त्यांच्यापासून रोगाचा सर्वाधिक प्रसार होत आहे.

कॅनडातील सुमारे ६३ लाख लोकांना अद्याप करोना लशीची पहिली मात्रा मिळालेली नाही, तसेच ५० लाखांहून अधिक जणांना दुसरी मात्रा देण्यात आलेली नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. करोनापासून सुरक्षित राहण्यासाठी सर्वच वयोगटात ८० टक्क्यांहून अधिक लोकांचे लसीकरण होणे आवश्यक आहे, असे त्या म्हणाल्या.  उपमुख्य आरोग्य अधिकारी होवार्ड न्जो यांनी सांगितले की, देशात मोठ्या प्रमाणावर लसीकरण होत असल्याने संसर्गदर वाढला तरी याआधी झालेल्या मृत्यूंइतके बळी जाणार नाहीत, तसेच रुग्णांलयात तितक्या जणांना दाखल करावे लागणार नाही.

 

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Corona virus infection corona vaccination delta plus virus health officials in canada akp
First published on: 01-08-2021 at 00:19 IST