करोनासंदर्भातील सर्व माहिती देणारे आरोग्य सेतू अ‍ॅप सुरक्षित असल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे. फ्रान्समधील प्रसिद्ध सुरक्षा तज्ज्ञ (किंवा तांत्रिक भाषेत ज्याला एथिकल हॅकर म्हणतात) इलियट अँडरसन याने मात्र आरोग्य सेतू अ‍ॅप हॅक करता येऊ शकते असा दवा केला आहे. इतकच नाही तर करोना रुग्णांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि कॉनटॅक्ट ट्रेसिंगच्या नावाखाली हे अ‍ॅप लोकांचे जीपीएस लोकेशन सरकारच्या मालकीच्या सर्व्हरवर पाठवत असून हे अ‍ॅप म्हणजे पाळत ठेवणारे अ‍ॅप आहे असा गौप्यस्फोट इलियटने केला आहे. इतकचं नाही तर हे अ‍ॅप हॅक होणार नाही हा दावा इलियटने फेटाळून लावला असून सर्व काही हॅक होऊ शकतं असं म्हटलं आहे.

इलियटने ५ मे रोजी आरोग्य सेतूसंदर्भात शंका उपस्थित केली होती. आधारकार्ड अ‍ॅपच्या सुरक्षेसंदर्भात माहिती उघड केली होती. त्याने आता आरोग्य सेतू अ‍ॅपबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. या ट्विटमध्ये त्याने काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना टॅग करत ते या अ‍ॅपबद्दल बरोबर होते असंही म्हटलं आहे. “हाय, आरोग्य सेतू, तुमच्या अ‍ॅपमध्ये सुरक्षेसंदर्भातील अडचण दिसून आली आहे. ९ कोटी भारतीयांची खासगी माहिती उघड होण्याचा धोका आहे. तुम्ही मला पर्सनल मेसेजवर संपर्क करु शका का? महत्वाची नोंद राहुल गांधी बरोबर होते,” असं ट्विट इलियटने मंगळवारी (५ मे रोजी) केलं होतं.

या ट्विटनंतर तासाभरातच भारत सरकारच्या अधिकाऱ्यांनी आपल्याशी संपर्क साधल्याची माहिती इलियटने दिली. इलियटने ९ कोटी भारतीयांच्या आरोग्यासंदर्भातील माहिती अशी उपलब्ध करुन देणे चुकीचे असल्याचे मत व्यक्त केलं आहे. “माझ्याकडे खूप कमी संयम आहे. मी एका ठराविक काळानंतर या अ‍ॅपवरील खासगी माहिती उघड करणार आहे,” असा इशाराच इलियटने दिला होता.

मात्र बुधवारी (६ मे रोजी) सरकारने यासंदर्भात स्पष्टीकरण देत “या अ‍ॅपवरील माहितीची चोरी किंवा सुरक्षेसंदर्भात कोणताही गोंधळ झालेला नाहीय. तसेच या हॅकर्सने या अ‍ॅपवरुन खासगी माहिती उघड होत असल्याचे सिद्ध केलेले नाही,” असं ट्विट केलं होतं.

यावर प्रतिक्रिया देताना हॅकरने “तुम्ही म्हणत आहात की इथे काहीच उघड झालं नाहीय. आपण इथे पाहूयात. मी तुम्हाला उद्या भेटतो,” असं ट्विट केलं होतं.

दोनच दिवसात या हॅकरने काही ट्विट केले असून आरोग्य सेतूसंदर्भात काही धक्कादायक खुलासा केले आहे. तसेच आरोग्य सेतू अ‍ॅप हे पाळत ठेवण्यासाठी वापरण्यात येत असल्याचा आरोप त्याने केला आहे.

“हे मोबाइल अ‍ॅप तुमच्या जीपीएसचे कॉर्डीनेट्स सतत सरकारी मालकीच्या सर्व्हरवर पाठवत असेल तर ते पाळत ठेवण्यासाठीच आहे. आरोग्य सेतू हे पाळत ठेवण्यासाठीच आहे,” असं ट्विट करत इलियटने आरोग्य सेतू असा हॅशटॅग वापरला आहे.

पुढे काही ट्विटमध्ये त्याने अनेक प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. यामध्ये हे अ‍ॅप कोवीड १९ ला हरवण्यासाठी गरजेचे आहे का?, नक्की या अ‍ॅपचा फायदा काय? हे अ‍ॅप नसेल तर काय? अशा अनेक प्रश्नांना त्याने उत्तरे दिली आहेत. पाहुयात त्याने प्रश्न आणि उत्तरे स्वरुपात केलेली ट्विट…

दुसरे ट्विट
तुम्हाला काळजी करण्याची गरज आहे का?
सरकार जर तुम्हाला हे अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठी बळजबरी करत असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज आहे.

तिसरे ट्विट
ही काही अडचण नाहीय हे तर अ‍ॅपचे फिचर आहे
आरोग्य सेतू ज्या पद्धतीने बनवण्यात आलं आहे ते एक पाळत ठेवणारं अ‍ॅप आहे. त्यांच्या तुमच्या प्रायव्हसीची काहीही पडलेली नाही. तुमच्या घरामध्ये शेजाऱ्यांना डोकावण्याची परवानगी देणे याला तुम्ही अ‍ॅपचे फिचर म्हणू शकत नाही.

चौथे ट्विट
करोनाविरुद्ध लढण्यासाठी हे अ‍ॅप आहे.
नाही त्यासाठी तुम्हाला संसर्ग झालेल्यांच्या चाचण्या करणे, मास्क, ग्लोव्हज, संपर्कात आलेल्यांचा शोध घेणे, सोशल डिस्टन्सिंग, संसर्ग झालेल्यांचे विलगीकरण या सर्वांची गरज आहे. केवळ अ‍ॅपने संसर्ग थांबवता येणार नाही.

पाचवे ट्विट
“सरकारने नंतर माझी माहिती डिलीट करणार असल्याचे सांगितले आहे. तसेच मीही हे अ‍ॅप डिलीट करु शकतो.”
तुमचं चुकतयं पाळत ठेवणाऱ्या या गोष्टी कायमच्या इथेच असणार आहे. हवं तर यावर आपण पैंज लावू शकतो.

सहावे ट्विट
कॉनटॅक्ट ट्रेसिंग अ‍ॅपशिवाय करोनाला हरवणे शक्य नाही
हा दावा खोटा आहे. ही काही पहिली साथ नाही. याआधीही अशाप्रकारच्या साथीमध्ये अ‍ॅपच्या मदतीशिवाय कॉनटॅक्ट ट्रेसिंग म्हणजेच संसर्ग झालेल्यांना शोधण्यात आलं आहे.

सातवे ट्विट
मी अ‍ॅप डिलीट केलं तर त्यांच्या माझ्या लोकेशनची माहिती कळेल का?
अर्थात नाही. या अ‍ॅपच्या माध्यमातून तर नाहीच. कारण तुमच्या मोबाइलमध्ये अ‍ॅप नसल्याने ते तुम्हाला ट्रेस करु शकत नाहीत.

आठवे ट्विट
“माझा माझ्या सरकारवर विश्वास आहे. मी हे अ‍ॅप इन्सटॉल करणारच”
मी तुमच्या या निर्णयाचा आदर करतो. हा एक स्वतंत्र देश आहे. कोणाला काय हवं ते करु शकतात. मात्र तुम्ही एका ढोंगी सुरक्षेच्या नावाखाली स्वत:ची खासगी माहिती देताय हे लक्षात ठेवा.

नववे ट्विट
“मी आधीच माझी माहिती फेसबुक, ट्विटर आणि टिंडरसारख्या अ‍ॅपला देतोय. त्यामुळे मला माझ्या सरकारला ही माहिती देण्यात काहीच अडचण नाहीय”
तुम्हाला तुमची माहिती चुकीच्या लोकांपर्यंत पाठवण्याची वाईट सवय असल्याने ती सुरुच ठेवली पाहिजे असं काही नाहीय. शेवटी सर्व नियंत्रण तुमच्या हातात आहे हे लक्षात घ्या.

दहावे ट्विट
“आपण २१ व्या शतकात राहतो. आपल्याकडे तंत्रज्ञान आहे. त्यामुळे लोकांना ट्रॅक केलं तर आपण करोनाला नक्कीच हरवू शकतो”
तुम्ही फक्त चीनकडे बघा. चीन त्यांच्या देशातील नागरिकांवर कशापद्धतीने लक्ष ठेऊन आहे याचा आपण विचारही करु शकत नाही. तरी त्यांच्याकडे करोनाचा प्रादुर्भाव झाला आणि ते काहीच करु शकले नाहीत.

अकरावे ट्विट
“प्रयाव्हसी ही श्रीमंतांसाठी असते”
नाही प्रायव्हसी हा मूलभूत अधिकार आहे. तो सर्वांना मिळाचा पाहिजे.

बारावे ट्विट
“माझ्या २० वर्षीय भावाने तू खोटे दावे करत असून तू सांगितलेल्या अडचणी या खरं तर अडचणी नाहीयत असं मला सांगितलं.”
मी उपस्थित केलेले दोन्ही मुद्दे एक माध्यम म्हणून या अ‍ॅपसंदर्भात प्रश्न चिन्ह उपस्थित करतात. तुमच्या सुरक्षेबद्दल आरोग्य सेतूचे निर्माते जास्त काळजी करत नाहीत. त्यांनी आताच काही निर्दर्शनास आणून दिलेल्या अडचणी दूर केल्या.

तेरावे ट्विट
“हे अ‍ॅप हॅक होऊ शकत नाही असं सरकारचं म्हणणं आहे”
हॅक होऊ शकत नाही असं काहीच नाहीय. थोडीशी प्रेरणा, थोडं कौशल्य असेल तर सर्वकाही हॅक करता येतं.

चौदावे ट्विट
“इथे भारतामध्ये काही लोकांकडे जेवण आणि वीज सारख्या साध्या गोष्टी नाहीयत त्यामुळे आम्ही प्रायव्हसीबद्दल चिंता करत नाही”
काही लोकांना काळजी आहे. आणि पुन्हा प्रायव्हसी सर्वांचा हक्क आहे. त्यांना किमान गरजेच्या गोष्टी तर पुरवूच पण त्याचबरोबर त्यांच्या प्रायव्हसीचीही काळजी घेऊयात. त्याच्याशी तडजोड करता येणार नाही.

पंधरावे ट्विट
“तुला फक्त लोकांचे लक्ष वेधून घ्यायचं आहे आणि फॉलोअर्स वाढवायचे आहेत”
एवढं मोठं आणि इतके फॉलोअर्स असणारे ट्विटर अकाऊंट हाताळणं किती कठीण आहे याचा तुला अंदाज नाहीय. तुम्हाला रोज हजारो प्रतिक्रिया, मेसेज आणि अपमान करणाऱ्या टोल्यांचा सामना करावा लागतो. मी या माध्यमातून पैसा कमवत नाही. अनेकदा हे छान वाटतं पण त्याचा कधीतरी फटकाही बसतो.

सोळावे ट्विट
“तू तुझा वेळ ट्विटवर का घालवतो आहेस?”
परिणाम साधण्यासाठी. एकत्र येऊन आपण अनेक भन्नाट गोष्टी करु शकतो. प्रायव्हसीसंदर्भात जागृकता निर्माण करणारी प्रत्येक संधी स्वीकारायला हवी. खास करु तेव्हा जेव्हा अनेक प्रसारमाध्यमे तुमच्या ट्विटवर व्यक्त होत असतील.

सतरावे ट्विट
“सुरक्षेशी संदर्भातील लोकं अशाप्रकारे माहिती उघड करत नाहीत”
हा चर्चेचा मुद्दा होऊ शकतो. पण एखादा विषय मांडण्याची किंवा उपस्थित करण्याची आदर्श पद्धत अस्तित्वात नाही. हे आदर्श मार्ग नसला तरी परिणामकारक नक्कीच आहे. तुम्हाला बग मिळाला तर तुम्ही त्याचे मालक असता या विचाराने मी काम करतो.

इलियटने आरोग्य सेतूसंदर्भात ट्विट केल्यानंतर अनेक भारतीयांनी त्याला थेट मेसेज करुन यासंदर्भात अनेक प्रश्न विचारले. त्यापैकी निवडक आणि महत्वाच्या प्रश्नांना त्याने या ट्विट थ्रेडच्या माध्यमातून उत्तर दिलं आहे. त्याने थेट मेसेज करण्याचा पर्याय बंद करुन ठेवल्याचीही माहित ट्विटवरुन दिली आहे.

केंद्राने करोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेतू अ‍ॅप तयार केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते अनेक केंद्रीय मंत्री या अ‍ॅपचा प्रचार करताना दिसत आहेत. हे अ‍ॅप सरकारी तसेच खासगी कर्मचाऱ्यांसाठी अनिवार्य असल्याचेही सांगण्यात आलं आहे. पुढील काही आठवड्यांमध्ये ३० कोटी लोकांनी हे अ‍ॅप डाऊनलोड करायला हवं असा केंद्राचा मानस आहे.