करोना व्हायरसने जगभरात थैमान घातला असताना अर्थव्यवस्थेवरही त्याचा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. भारतातही करोना व्हायरसने घुसखोरी केली असून जर योग्य कारवाई केली नाही तर भारतीय अर्थव्यवस्था नष्ट होईल अशी भीती काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केली आहे. यावेळी त्यांनी मोदी सरकार आपल्याच धुंदीत असल्याची टीका केली आहे. राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून मोदी सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “मी वारंवार हे बोलत राहणार आहे. करोना व्हायरस खूप मोठी समस्या आहे. समस्येकडे दुर्लक्ष करणं हा उपाय नाही. जर कठोर कारवाई केली नाही तर भारतीय अर्थव्यवस्था नष्ट होईल. सरकार आपल्याच धुंदीत आहे”.

राहुल गांधी यांनी हे ट्विट करताना आपल्या एका जुन्या ट्विटचा संदर्भ दिला आहे. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं होतं की, “करोना व्हायरस आपली लोक आणि भारतीय अर्थव्यवस्थेसाठी मोठा धोका आहे. सरकार या धोक्याकडे गांभीर्याने घेत नाही असं मला वाटत आहे. योग्य वेळेत कारवाई करणं महत्त्वाचं आहे”.