करोनाचा प्रादुर्भाव देशात वाढत असल्याने संपूर्ण लॉकडाउनची घोषणा करण्यात आली. त्यानंतर हातावर पोट असणारे कामगार आपआपल्या राज्यांमध्ये पायीच चालत निघाले. हे कष्ट कमी म्हणून की काय आता त्यांना अमानुष वागणूक दिली जात असल्याचे वृत्त समोर आलं आहे. उत्तर प्रदेशमधील बरेली शहराच्या सीमेवर परराज्यातून येणाऱ्या कामगारांना रस्त्यावरच गटागटाने सॅनिटायझऱ सोल्युशनने अंघोळ घातली जात आहे. या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे.

परराज्यातून आपल्या राज्यातील शहरांमध्ये आलेल्या कामगारांना रस्त्यावर बसवण्यात आल्याचं व्हायरल झालेल्या व्हिडिओमधील दृष्यांमध्ये दिसत आहे. महिला आणि पुरुष अशा सर्वच कामगारांना रस्त्यावर एकत्र बसवून त्यांच्यावर शहरातील पालिका प्रशासनाचे सफाई कर्मचारी पाईपाने सॅनिटायझर सोल्युशन फवारतात. धक्कादायक बाब म्हणजे या कामगारांबरोबर त्यांच्या सामानावरही हे सॅनिटायझर सोल्युशन मारलं जात आहे. या व्हिडिओमध्ये एक अधिकारी सुरु असणाऱ्या या प्रकरणाचे चित्रिकरण करताना दिसत आहे तर दुसरा अधिकारी या कामगारांवर सॅनिटायझर सोल्युशन फवारलं जात असतानाच त्यांना डोळे बंद करण्याच्या सुचना देत आहे.

बरेलीमधील कोवीड-१९ संदर्भातील अधिकारी असणाऱ्या अशोक गौतम यांनी ही घटना घडल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे, असं ‘द हिंदू’ने आपल्या वृत्तामध्ये म्हटलं आहे. पाण्यामध्ये क्लोरीन मिक्स करुन तयार करण्यात आलेल्या सॅनिटायझर सोल्युशनने अधिकाऱ्यांनी शहरात येणाऱ्या कामगारांवर फवारणी केली. मात्र यासाठी कोणतेही रसायन वापरण्यात आलं नव्हतं, असं गौतम यांनी म्हटलं आहे.

उत्तर प्रदेश सरकारने जागोजागी अडकून पडलेल्या कामगारांना आपल्या गावी पोहचता यावे यासाठी विशेष बस सोडल्या आहेत. याच बसमधून येणाऱ्या कामगारांना शहराच्या सिमेवर उतरवून त्यांच्यावर अशा पद्धतीने फरवारणी केली जात आहे. मोठ्याप्रमाणात कामगार येत असल्याने सुरक्षेसाठी ही फवारणी कऱण्यात येत असल्याचा दावा गौतम यांनी केला आहे. “आम्ही त्यांच्या सुरक्षेसाठी हे करत आहोत. तसेच फवारणी करताना त्यांना डोळे बंद करण्यासही सांगितलं जात आहे,” असं सांगत गौतम यांनी सरकारी अधिकाऱ्यांच्या कृतीचं समर्थन केलं आहे. करोनाचा संसर्ग होण्यापासून थांबवण्यासाठी अशी फवारणी गरजेची आहे असा युक्तीवादही गौतम यांनी केला आहे. “फवारणी झाल्यानंतर कामगार ओले होणार हे नैसर्गिक आहे. कपडे ओले झाल्याने कपड्यांवरील विषाणूही नष्ट होतील. कामगार ओले होण्यापेक्षा त्यांना सुरक्षित ठेवणे अधिक गरजेचे आहे,” असं गौतम यांनी ‘द हिंदू’शी बोलताना सांगितलं. आता कामगार शहरामध्ये येण्याचं प्रमाण कमी झालं आहे, त्यामुळे पुन्हा अशा पद्धतीने फवारणी होणार नाही असंही गौतम यांनी स्पष्ट केलं आहे.

या प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाला जाग आली आहे. जिल्हाधिकारी नितीश कुमार यांनी या कामगारांना उघड्यावर अंघोळ करण्यास भाग पाडणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. “बरेलीमधील अती उत्साही महानगपालिका आणि अग्निशामन दलाच्या अधिकाऱ्यांना बस सॅनिटाइज कऱण्यास सांगण्यात आलं होतं. तर त्यांनी लोकांवरच फवारणी केली,” असं नितीश कुमार यांनी म्हटलं आहे. या सर्व कामागारांची नंतर वैद्यकीय चाचणी करण्यात आल्याची माहिती प्रमुख आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेले नाही.