तत्कालीन रेल्वेमंत्री ललित नारायण मिश्रा यांची चाळीस वर्षांपूर्वी बिहारमध्ये समस्तीपूर येथे रेल्वे स्थानकावर बॉम्बस्फोटात हत्या करण्यात आल्याच्या प्रकरणी दिल्ली न्यायालयाने चार आरोपींना खून व गुन्हेगारी कट या आरोपाखाली दोषी ठरवण्यात आले.
जिल्हा न्यायाधीश विनोद गोयल यांनी रंजन द्विवेदी, संतोषानंद अवधूत, सुदेवानंद अवधूत व गोपालजी यांना भादंवि कलम (३०२)-खून, १२० बी (गुन्हेगारी कट) ३२६ (स्वत:हून दुसऱ्याला हत्याराने जखमी करणे) ३२४- स्वत:हून दुसऱ्याला जखमी करणे या आरोपांखाली दोषी ठरवले आहे. न्यायालयाने त्यांना स्फोटक पदार्थ कायद्यान्वयेही दोषी ठरवले आहे. सविस्तर निकालपत्रानंतर रंजन द्विवेदी, संतोषानंदा अवधूत, सुदेवानंद अवधूत, गोपालजी यांना कलम १२० बी, ३०२, ३२६, ३२४, ३४ या भादंवि कलमान्वये दोषी ठरवले आहे. न्यायालयाने शिक्षा सुनावण्यासाठी पुढची तारीख १५ डिसेंबर दिली आहे त्यांना जन्मठेप किंवा मृत्युदंडाची शिक्षा होऊ शकते. सध्या ते जामिनावर सुटलेले आहेत. या सर्व आरोपींना कोठडी देण्यात आली आहे असे न्यायालयाने सांगितले. चार आरोपींच्या वकिलांनी आम्ही वरिष्ठ न्यायालयात अपील करणार असल्याचे सांगितले. समस्तीपूर रेल्वे स्थानकावर रेल्वेमंत्री मिश्रा २ जानेवारी १९७५ रोजी जखमी झाले होते. त्यांचे दुसऱ्या दिवशी निधन झाले. मिश्रा यांच्याशिवाय या बॉम्बस्फोटात इतर दोन जण मरण पावले होते. या खटल्यात २०० साक्षीदार तपासण्यात आले. त्यातील १६१ फिर्यादी पक्षाचे तर ४० बचाव पक्षाचे साक्षीदार होते. या प्रकरणी १ नोव्हेंबर १९७७ रोजी पाटणा येथे सीबीआय न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते व नंतर हे प्रकरण महाधिवक्तयांच्या विनंतीनुसार दिल्ली न्यायालयात वर्ग करण्यात आले होते.