Omicron संसर्ग फेब्रुवारीमध्ये गाठणार उच्चांक, पण दुसऱ्या लाटेपेक्षा….; अभ्यासातून समोर आली माहिती

मागच्या दोन लाटांप्रमाणेच सौम्य लॉकडाउन, गर्दीवर निर्बंध, रात्रीची संचारबंदी अशा प्रकारचे उपाय करुन विषाणूसंसर्गाला उच्चांक गाठण्यापासून रोखता येईल, असंही अभ्यासकांचं म्हणणं आहे.

B11529 COVID19 variant

करोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनच्या प्रादुर्भावामुळे सध्या जगभरात चिंतेचं वातावरण आहे. लवकरच या व्हेरिएंटमुळे करोनाची तिसरी लाट येणार असल्याच्या शक्यता वर्तवण्यात येत आहेत. फेब्रुवारी महिन्यात ही तिसरी लाट फेब्रुवारी महिन्यात उच्चांक गाठू शकते, असा इशारा आयआयटीमधल्या अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.

करोना विषाणूसंदर्भातला अभ्यास करणारे आयआयटीमधले शास्त्रज्ञ मणिंद्र अग्रवाल यांनी हा अंदाज वर्तवला आहे. मात्र ओमायक्रॉनमुळे येणारी ही तिसरी लाट दुसऱ्या लाटेपेक्षा सौम्य स्वरुपाची असेल, असा अंदाज अग्रवाल यांनी व्यक्त केला आहे. अग्रवाल म्हणाले, ओमायक्रॉनच्या अनुषंगाने आमचा सध्याचा अंदाज असा आहे की देशात फेब्रुवारीपर्यंत तिसरी लाट दिसू शकते परंतु ती दुसऱ्या लहरीपेक्षा सौम्य असेल. आतापर्यंत आपण पाहिले आहे की ओमायक्रॉनची तीव्रता डेल्टा व्हेरिएंटइतकी नाही.

हेही वाचा – “…तर भारत ओमायक्रॉनपासून स्वत:चं रक्षण करू शकेल”, IMA नं सांगितला उपाय; प्रवासबंदीबाबतही मांडली भूमिका!

ओमायक्रॉनचा उगम जिथे झाला त्या दक्षिण आफ्रिकेतल्या रुग्णसंख्या तसंच संसर्गावर नीट लक्ष ठेवून त्याचा अभ्यास केला जाईल. दक्षिण आफ्रिकेत रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत अद्यापही वाढ नोंदवण्यात आलेली नाही. ज्यावेळी रुग्णसंख्या आणि रुग्णालयात दाखल होणाऱ्यांच्या संख्येविषयीची अधिक माहिती मिळेल, त्यावेळी अधिक ठामपणे निष्कर्ष काढता येईल, असंही अग्रवाल म्हणाले.

नव्या व्हेरिएंटचा प्रसार वेगाने होत असला तरी त्याची तीव्रता डेल्टा व्हेरिएंटच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे मागच्या दोन लाटांप्रमाणेच सौम्य लॉकडाउन, गर्दीवर निर्बंध, रात्रीची संचारबंदी अशा प्रकारचे उपाय करुन विषाणूसंसर्गाला उच्चांक गाठण्यापासून रोखता येईल, असंही अग्रवाल म्हणाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Covid 19 third wave likely to hit india by february vsk