scorecardresearch

१२-१४ वयोगटाचे लसीकरण उद्यापासून ; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची घोषणा, कोर्बेव्हॅक्सचा वापर

करोना संसर्गामध्ये लक्षणीय घट झाल्याने देशभरातील शाळा सुरू होत असताना सरकारने मुलांच्या लसीकरणाची घोषणा केली आहे.

नवी दिल्ली : देशातील १२ ते १४ वयोगटातील मुलांचे करोना लसीकरण बुधवार, १६ मार्चपासून सुरू करण्याची घोषणा केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी सोमवारी केली.

हैदराबाद येथील बायॉलॉजिकल इ. लिमिटेड या कंपनीने तयार केलेल्या कोर्बेव्हॅक्स या करोना लशीद्वारे १२ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. जर मुले सुरक्षित असतील तर देश सुरक्षित असेल, असे ट्वीट आरोग्यमंत्री मंडाविया यांनी केले आणि मुलांच्या लसीकरणाची घोषणा केली. त्याचबरोबर ६० वर्षांवरील नागरिकही आता वर्धक मात्रा घेऊ शकतील, असेही मंडाविया यांनी स्पष्ट केले. १२ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांचे आणि ६० वर्षांवरील ज्येष्ठांचे लसीकरण करून घेण्याचे आवाहन मंडाविया यांनी त्यांच्या कुटुंबीयांना केले.

केंद्र सरकारने तज्ज्ञ संस्थांशी विचारविनिमय केल्यानंतर १२ ते १४ वर्षे वयोगटांसाठी लसीकरण सुरू करण्याचा निर्णय घेतला, असे आरोग्य मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे. १४ वर्षांवरील मुलांचे लसीकरण सध्या केले जात आहे.

करोना संसर्गामध्ये लक्षणीय घट झाल्याने देशभरातील शाळा सुरू होत असताना सरकारने मुलांच्या लसीकरणाची घोषणा केली आहे. ६० वर्षांंवरील नागरिकांना वर्धक मात्रा देण्यासाठी सहव्याधीबाबतची अट त्वरित रद्द करण्यात येईल, असेही आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले. गेल्या वर्षी १६ जानेवारीपासून देशव्यापी लसीकरण मोहीम राबविण्यात आली. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले. आघाडीवरील कर्मचाऱ्यांचे लसीकरण गेल्या वर्षी २ फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आले होते.

१२ ते १४ वयोगटातील ७.११ कोटी मुले

सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार देशात १२ ते १४ वयोगटातील सात कोटी ११ लाख मुले आहेत. त्यांचे लसीकरण करण्यासाठी बायॉलॅजिकल ई लिमिटेड कंपनीने पहिल्या टप्प्यात कोर्बेव्हॅक्स लशीच्या पाच कोटी मात्रा केंद्राला दिल्या असून, राज्यांना त्यांचे वितरण करण्यात आले आहे.

ज्येष्ठांना वर्धक मात्रा

’सरसकट सर्वच ६० वर्षांवरील नागरिकांना वर्धकमात्रा देण्यात येणार आहे. वर्धकमात्रेसाठीची सहव्याधीबाबतची अट रद्द करण्यात येईल, असे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले.

’आरोग्य कर्मचारी आणि ६० वर्षांवरील सहव्याधीग्रस्तांना वर्धक मात्रा देण्यास १० जानेवारीपासून सुरुवात करण्यात आली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Covid vaccination for kids aged between 12 to 14 start tomorrow zws

ताज्या बातम्या