राजकीय नेत्यांकडून वारंवार धक्कादायक विधाने केली जातात. त्यात आता आसाममधील भाजपाच्या आमदाराने भर टाकली आहे. श्रीकृष्णासारखी बासरी वाजवली तर गायी जास्त दूध देतात, असा दावा आमदार दिलीप कुमार पॉल यांनी केला आहे.

दिलीप कुमार पॉल हे बराक व्हॅलीतील सिल्चर मतदारसंघाचे आमदार आहेत. एका सांस्कृतिक कार्यक्रमात संगीताच्या सकारात्मक परिणामांविषयी बोलताना पॉल यांनी हे विधान केले. मी संगीत आणि नृत्याच्या सकारात्मक परिणामांविषयी माहिती गोळा करण्यास सांगितले. कारण जर श्रीकृष्णासारखी बासरी वाजवली तर गाय जास्त दूध देतात आणि हे वैज्ञानिकरीत्याही सिद्ध झालेले आहे, असे ते म्हणाले. बासरी वाजवल्याने गाई जास्त दूध देतात हे कोणी सिद्ध केले आहे, असा प्रश्न पॉल विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, गुजरातमधील एका स्वयंसेवी संस्थेने काही वर्षांपूर्वी हे संशोधन केले आहे. त्यात बासरीची धून ऐकल्याने गाय जास्त प्रमाणात दूध देते हे सिद्ध करण्यात आले आहे. परदेशातील संकरित गाय आणि देशी गाय यांच्या दूधात खूप फरक आहे. संकरित गायीचे दूध पांढरे असते, तर देशी गायीचे दूध पिवळसर असते आणि अधिक चवदारही. संकरित गायीपेक्षा देशीच्या गायीच्या दूधापासून बनवलेले चीज, बटर यासारखे पदार्थ अधिक चविष्ट असतात, असा दावा पॉल यांनी केला.

आसाम, मेघालय, पश्चिम बंगाल आणि त्रिपूरा या राज्यातून बांगलादेशात होत असलेल्या गायींच्या तस्करीवर त्यांनी चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, आपण गाईला माता म्हणतो. पण दरवर्षी हजारो गायींची बांगलादेशात तस्करी केली जात आहे. हे थांबायला हवे, असेही ते म्हणाले. पॉल यांच्या दावा चर्चा करण्यासारखा असला, तरी यावर परदेशात संशोधन करण्यात आले आहे. लेन्चिस्टर विद्यापीठातील दोन मानसशास्रज्ञांनी २००१मध्ये यावर संशोधन केले आहे. त्यांच्या संशोधनानुसार मंद चालीवरील संगीत ऐकल्यानंतर गाईच्या दूध देण्याच्या प्रमाणात ३ टक्के वाढ होते, असे म्हटले आहे.