नवी दिल्ली : उपराष्ट्रपतीपदासाठी मंगळवारी मतदान होणार असून सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे (एनडीए) विजयासाठी पुरेसे संख्याबळ आहे, तरीही यावेळी भाजपने सावध पवित्रा घेतल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. ‘एनडीए’ व ‘इंडिया’ आघाडीच्या उमेदवारांच्या मतांमधील फरक गेल्यावेळी प्रमाणे (धनखड यांच्या वेळी) मोठा नसल्याने भाजपने सलग तीन दिवस एकेका मतासाठी काथ्याकूट केल्याचे पाहायला मिळाले.
गेल्यावेळी उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत ‘एनडीए’चे उमेदवार जगदीप धनखड यांचा विजय एकतर्फी झाला होता, त्यांना ७५ टक्के मतदान झाले होते. यामध्ये तृणमूल काँग्रेसनेही धनखड यांना मतदान केले होते. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल व ‘एनडीए’चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांची निवड इतकी एकतर्फी होण्याची शक्यता नाही. राधाकृष्णन यांना सुमारे ५५-५६ टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे विरोधी ‘इंडिया’ आघाडीचे संयुक्त उमेदवार सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश बी. सुदर्शन रेड्डी यांना सुमारे ४५ टक्के वा त्याहून अधिक मते मिळू शकतात.
ऐनवेळी मित्र पक्षांच्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले तर ‘एनडीए’ अडचणीत येऊ शकते हे लक्षात घेऊन भाजपकडून ‘एनडीए’तील घटक पक्ष तसेच, वायएसआर काँग्रेस, बीआरएस, बिजू जनता दल आदी पक्षांशी संपर्क साधण्यात आला. यावेळी दोन्ही उमेदवारांच्या मतांमध्ये सुमारे १०० सदस्यांचा फरक राहण्याची शक्यता दिसू लागली होती. हे संख्याबळ पुरेसे दिसत असले तरी धनखड यांना मिळालेल्या ५२८ मतांच्या तुलनेत ते कमी आहे.
‘एनडीए’च्या खासदारांची ‘शिकवणी’
‘एनडीए’कडे पुरेसे संख्याबळ असले तरी गेल्या वेळीप्रमाणे वर्चस्व गाजवता येणार नाही ही बाबही स्पष्ट झाली आहे. त्यामुळे भाजपने ‘एनडीए’तील घटक पक्षांच्या एकेका खासदाराशी संपर्क साधला असल्याचे सांगितले जाते. भाजपच्या दोन्ही सदनांतील खासदारांना शनिवारीच दिल्लीत दाखल होण्यास सांगितले गेले होते. सोमवारी ‘एनडीए’च्या खासदारांसाठी मतदानाची रंगीत तालीम आयोजित करण्यात आली.
आकड्यांचा खेळ कोणाच्या बाजूने?
● लोकसभेमध्ये ‘एनडीए’ आघाडीकडील संख्याबळ २९३ असल्याचे मानले जाते. वायएसआर काँग्रेसचे ४ खासदार सत्ताधारी आघाडीला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. तसे झाले तर ‘एनडीए’ला लोकसभेत २९७ सदस्यांचे पाठबळ मिळू शकेल असे मानले जाते.
● त्या तुलनेत ‘इंडिया’ आघाडीकडे २४५ सदस्यांचे पाठबळ आहे. ‘एआयएमआयएम’च्या असादुद्दीन ओवैसी यांनी ‘इंडिया’ आघाडीला पाठिंबा दिला आहे.
● बारामुल्लाचे अपक्ष खासदार इंजिनीअर रशीद यांना मतदान करण्याची परवानगी मिळाल्यामुळे ते मतदासाठी तुरुंगातून संसदेमध्ये येऊ शकतील.
● आम आदमी पक्ष (आप) इंडिया आघाडीचा भाग नसला तरी, ‘आप’ने विरोधी आघाडीला पाठिंबा दिला असल्याने तीनही खासदार ‘इंडिया’ आघाडीसाठी मतदान करण्याची शक्यता आहे.
● राज्यसभेत ‘एनडीए’कडे १३१ सदस्यांचा पाठिंबा असल्याचे मानले जाते. राज्यसभेतील वायएसआर काँग्रेसचे ७ सदस्यही ‘एनडीए’लाच पाठिंबा देण्याची शक्यता मानली जात आहे.
● ‘आप’कडे राज्यसभेत ९ खासदार आहेत. राज्यसभेतील संख्या गणित पाहता ‘एनडीए’ला सुमारे १४५-१५० सदस्यांचे पाठबळ मिळण्याची अपेक्षा आहे. ‘इंडिया’ आघाडीला सुमारे ८८ ते ९० सदस्यांचे पाठबळ मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बीआरएस, बीजेडी गैरहजर !
सध्या लोकसभेत ५४२ सदस्य आहेत, एक जागा रिक्त आहे. राज्यसभेत २३९ सदस्य असून ५ जागा रिक्त आहेत. त्यामुळे संसदेच्या दोन्ही सदनांमध्ये मिळून एकूण खासदारांची म्हणजेच मतदारांची संख्या ७८१ आहे. बहुमतासाठी ३९१ सदस्यांच्या पाठिंब्याची गरज आहे. पण, ‘बीआरएस’ने सोमवारी मतदानात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. लोकसभेत या पक्षाचा एकही खासदार नसला तरी राज्यसभेत ४ सदस्य आहेत. शिवाय, बिजू जनता दलानेही कोणाच्याही पारड्यात मत न देण्याचा निर्णय घेतल्याने मंगळवारी राज्यसभेतील या पक्षाचे ७ खासदार मतदान करणार नाहीत. तसे झाले तर, दोन्ही आघाडीच्या उमेदवारांना बहुमतासाठी ३८६ सदस्यांचे पाठबळ लागेल. या निवडणुकीत विजयासाठी मतदानाच्या ५० टक्के अधिक एक मत गरजेचे असते.