राजस्थानमधील सत्तारूढ काँग्रेस आणि विरोधी भाजप एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असे नमूद करून माकपने आपल्या पक्षाचा विजय झाल्यास शेतकऱ्यांशी संबंधित सर्व प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले आहे. माकपने गुरुवारी आपला ‘अपील डॉक्युमेण्ट’ निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला. शेतकऱ्यांसाठी डॉ. स्वामिनाथन अहवालाची अंमलबजावणी करण्यात येईल, असे माकपचे नेते रवींद्र शुक्ला आणि सुमिता चोप्रा यांनी सांगितले.
माकपने शेतमजुरांसाठीही नवा कायदा करण्याचे सूतोवाच केले आहे. शेतमजुरांचे जीवन सुसह्य़ व्हावे यासाठी त्यांना सामाजिक आणि आर्थिक सुरक्षा देणे गरजेचे आहे, असेही माकपने म्हटले आहे. असंघटित कामगारांसाठी काम करून त्यांना दरमहा किमान १० हजार रुपये वेतन मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न राहील, असेही माकपने म्हटले आहे. राजस्थानमध्ये माकपचे तीन आमदार असून पक्षाने या निवडणुकीसाठी एकूण ३७ उमेदवारांना उमेदवारी दिली आहे.