विश्वाच्या निर्मितीच्या वेळी नेमकी काय स्थिती होती याचे व्यवस्थित आकलन व्हावे यासाठी वैज्ञानिकांनी प्रयोगशाळेत एक मिलिसेकंद इतक्या काळाकरिता त्या वेळी जी प्रारणे निर्माण झाली तशी निर्माण करण्यात यश मिळवले आहे. शिकागो विद्यापीठाच्या भौतिकशास्त्रज्ञांनी अतिशय थंड असे सेसियम अणू वापरून निर्वात पोकळीत सूक्ष्म वैश्विक लहरींची निर्मिती केली, अशाच लहरी विश्वनिर्मितीच्या महाविस्फोटात तयार झाल्या होत्या.
भौतिकशास्त्राचे प्राध्यापक असलेले चेंग चिन यांनी सांगितले, की विश्वाच्या निर्मितीवेळी ती परिस्थिती तयार करणारा हा पहिलाच प्रयोग आहे. साधारण ३ लाख ८० हजार वर्षांपूर्वी विश्वाची निर्मिती झाली त्या वेळी महाविस्फोटामुळे वैश्विक सूक्ष्मलहरींची एक पाश्र्वभूमी तयार झाली होती. प्रयोगशाळेत आता कृत्रिमरीत्या तशीच परिस्थिती एका प्रयोगातून तयार करण्यात आली होती. विश्वाच्या प्रारंभीच्या अवस्थेत त्याचे जे प्रसरण होत गेले त्यातून द्रव्य व प्रारणे यांच्या वैश्विक मिश्रणात ध्वनिलहरींची निर्मिती झाली तशाच लहरी आताच्या प्रयोगात तयार करण्यात आल्याचे कॅलिफोर्निया इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेचे प्रमुख वैज्ञानिक चेन लंग ६य़ुंग यांनी म्हटले आहे. नेमका प्रयोग
अणूंचा एक पुंजक्यासारखा ढग केवल शून्याच्या एक अब्जांश तापमानाला थंड करण्यात आला. त्यानंतर विश्वनिर्मितीच्या वेळी ज्या प्रक्रिया घडल्या तशीच स्थिती निर्माण झाली. त्यात अतिशय थंड तापमानाला अणू सामूहिकरीत्या उत्तेजित होऊन हवेतील ध्वनिलहरींसारखे वागू लागले किंबहुना त्यांचे गुणधर्म तसे होते. त्यातून द्रव्य व प्रारणे यांचे एक दाट मिश्रण तयार झाले. विशिष्ट लयीत निर्माण झालेल्या या ध्वनिलहरींनी विश्वाच्या अगोदरच्या स्थितीत त्याचे प्रसरण कसे होत गेले यावरही या प्रयोगातून अधिक माहिती मिळणार आहे. चिन यांच्या प्रयोगशाळेत जे विश्व निर्माण करण्यात आले त्याचा व्यास ७० मायक्रॉन म्हणजे मानवी केसाच्या व्यासाइतका होता. आता वैश्विक किरणांचा जो वर्णपट आपण पाहतो तो प्रदीर्घ काळात बनलेला आहे तसाचा वैश्विक किरणांचा नमुना अवघ्या दहा मिलिसेकंदात स्थित्यंतरांसह प्रत्यक्षात आणणे हे एक आव्हान होते असे चिन यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Sep 2013 रोजी प्रकाशित
महाविस्फोटाची प्रयोगशाळेत निर्मिती
विश्वाच्या निर्मितीच्या वेळी नेमकी काय स्थिती होती याचे व्यवस्थित आकलन व्हावे यासाठी वैज्ञानिकांनी प्रयोगशाळेत एक मिलिसेकंद इतक्या काळाकरिता त्या वेळी जी प्रारणे निर्माण झाली...
First published on: 03-09-2013 at 01:41 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Creation of super explosion in a laboratory