India on China Renaming places in Arunachal Pradesh: अरुणाचल प्रदेशमधील काही ठिकाणांची नावे बदलण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चीनकडून करण्यात आला आहे. चीनच्या या कुरापतीला भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने सडेतोड उत्तर दिले आहे. “नावं बदलली तरी वास्तव बदलणार नाही. अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे”, असे उत्तर परराष्ट्र मंत्रालयाने बुधवारी दिले.
परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकृत प्रवक्ते रणधीर जयस्वाल बुधवारी एका निवेदनाद्वारे म्हणाले, “आम्हाला असे आढळून आले आहे की, चीनकडून भारतीय राज्य अरुणाचल प्रदेशमधील काही ठिकाणांची नावे बदलण्याचा निरर्थक आणि हास्यास्पद प्रयत्न करण्यात येत आहे. आम्ही आमच्या सैद्धांतिक भूमिकेशी एकनिष्ठ असून नाव बदलण्याच्या प्रयत्नांचा तीव्र निषेध करतो.”
माध्यमांच्या एका प्रश्नाला उत्तर देत असताना रणधीर जयस्वाल यांनी हे प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, “चीन अरुणाचल प्रदेशमधील काही ठिकाणांची नावे बदलण्याचा निरर्थक, हास्यास्पद प्रयत्न केला जात आहे. मात्र नावं बदलून वास्तव बदलणार नाही. अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि नेहमीच राहणार.”

चीनने अरुणाचल प्रदेशवर फार पूर्वीपासून डोळा ठेवलेला आहे. हा त्यांचा भाग असल्याचा दावा चीनकडून सतत करण्यात येतो. ईशान्येकडील अनेक शहरांची नावे बदलून चीनकडून नवे नवे नकाशे जाहीर करण्यात येतात. २०२४ साली चीनने अरुणाचल प्रदेशमधील ३० वेगवेगळ्या ठिकाणांची नावे बदलून त्याची यादी जाहीर केली होती. भारताने ही यादी फेटाळून लावली होती. अरुणाचल प्रदेशवर दावा सागंणाऱ्या चीनकडून भारतीय नेत्यांच्या अरुणाचल प्रदेशमधील दौऱ्यावरही आक्षेप घेण्यात येतो.
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी मागच्या महिन्यातच या प्रकरणावरून चीनला सुनावले होते. अरुणाचल प्रदेशमधील काही गावांना चीनने नावे दिल्यानंतर ते म्हणाले होते की, अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि भविष्यातही राहणारच. नावं बदलून काहीही हशील होणार नाही. जर मी तुमच्या घराचे नाव बदलले तर ते आमचे होणार का?