१०  देश ४६ दिवस ४८ सामने

मुंबई :  ICC Cricket World Cup दर चार वर्षांनी येणाऱ्या क्रिकेटच्या महाकुंभमेळ्याला गुरुवारपासून लंडनच्या ओव्हल मैदानावर सुरुवात होणार आहे. ‘आयसीसी’ विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या या १२व्या पर्वात जगातील अव्वल १० देश जगज्जेतेपदावर आपली नाममुद्रा कोरण्यासाठी एकमेकांशी निकराने झुंजतील.

तब्बल ४६ दिवस रंगणाऱ्या या महासंग्रामात राऊंड रॉबिन पद्धतीनुसार एकूण ४८ एकदिवसीय सामने होणार आहेत. साखळीत प्रत्येक संघ एकमेकांशी भिडणार आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त विजय मिळवून बाद फेरी गाठताना सर्व संघांची कसोटी लागणार आहे.

क्रिकेटच्या जन्मदात्या इंग्लंडमध्ये १९७५, १९७९, १९८३ आणि १९९९नंतर पाचव्यांदा विश्वचषकाचे आयोजन होत असले तरी यजमानांना गेल्या ४४ वर्षांपासूनचा विश्वचषक विजयाचा दुष्काळ संपवता आलेला नाही. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ विश्वचषकाचा प्रबळ दावेदार समजला जात आहे. १९८३ आणि २०११च्या विश्वविजेतेपदाची पुनरावृत्ती करण्यासाठी विराटसेनाही सज्ज झाली आहे. चेंडूतील फेरफार प्रकरणामुळे ऑस्ट्रेलियाची प्रतिमा मलिन झाली असली तरी या प्रकरणाचे सूत्रधार डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ यांच्या पुनरागमनानंतर आता कांगारूंचा संघ सहाव्यांदा विश्वचषक पटकाविण्यासाठी उत्सुक आहे.

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व संघांच्या कर्णधारांनी बुधवारी इंग्लंडच्या राणीची भेट घेतली.

* जवळपास सात आठवडे रंगणाऱ्या यंदाच्या विश्वचषकाचा थरार ‘लोकसत्ता’च्या वाचकांना अनुभवता येणार आहे.

* भारताचे माजी क्रिकेटपटू चंद्रकांत पंडित यांचे ‘यष्टीमागून’

* प्रा. संतोष सावंत यांचे ‘फ्री-हिट’

* सांख्यिकीतज्ज्ञ दीपक जोशी यांचे ‘आकडेपट’

* त्याशिवाय ‘थेट इंग्लंडमधून’ ही सदरे वाचकांच्या दिमतीला असतील.