भारत आज लीडसच्या मैदानात विश्वचषक स्पर्धेतील श्रीलंकेविरुद्ध शेवटचा साखळी सामना खेळणार आहे. भारतीय प्रसारमाध्यमांमध्ये या सामन्यापेक्षा भारताचा अव्वल फलंदाज महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीची चर्चा रंगली आहे. धोनी चौथा वर्ल्डकप खेळत असून ही त्याची शेवटची स्पर्धा आहे असा अंदाज काहीजणांनी वर्तवला आहे.

या दरम्यान एबीपी न्यूज चॅनलच्या पत्रकारने धोनीला गाठून त्याला थेट निवृत्तीसंबंधी प्रश्न विचारला. त्यावर धोनीने त्याच्या नेहमीच्या शैलीमध्ये मी कधी निवृत्त होणार हे मला सुद्धा माहित नाही असे उत्तर दिले. मी कधी निवृत्त होणार हे मला सुद्धा माहित नाही. पण उद्याच्या सामन्याआधी मी निवृत्त व्हावे अशी अनेकांची इच्छा आहे असे धोनी म्हणाल्याचे वृत्तवाहिनीने म्हटले आहे.

धोनीने या विधानामधून भारतीय संघ किंवा व्यवस्थापनावर निशाणा साधलेला नाही. प्रसारमाध्यमात सतत त्याच्या निवृत्तीची चर्चा करणाऱ्यांवर धोनीने अप्रत्यक्षपणे निशाणा साधल्याचे वृत्त वाहिनीने म्हटले आहे.

टीम इंडियाने विश्वचषक स्पर्धेची उपांत्यफेरी गाठली असली तरी अनेकांच्या मनात धोनीच्या फलंदाजीबद्दल शंका आहे. खरंतर धोनीने या वर्ल्डकपमध्ये खूप खराब खेळ केलेला नाही. पण धोनी आता पूर्वीसारखी फलंदाजी करत नाही. संघाला गरज असताना वेगाने धावा बनवण्याबरोबर मोठे फटके खेळत नाही असे टीकाकारांचे म्हणणे आहे. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात विजयासाठी मोठे फटके खेळण्याची गरज असताना धोनीने आपल्या खेळाची गती वाढवली नाही म्हणून त्याच्यावर टीका झाली होती. दुसऱ्या बाजूला भारतीय संघ व्यवस्थापन धोनी संघाच्या गरजेनुसार खेळ करतो असे सांगून त्याचा बचाव करत आहे.

धोनीबद्दल तुम्ही काही सांगू शकत नाही. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय त्याने तडकाफडकी घेतला होता. या क्षणाला त्याच्याबद्दल कुठलाही अंदाज वर्तवणे कठिण आहे असे बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.