ऋषिकेश बामणे
कोणताही संघ एखाद्या सामन्यात अथवा स्पर्धेत कितपत मजल मारेल हे त्या संघाच्या सलामीवीरांवर अवलंबून असते. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या विश्वचषकात आतापर्यंत झालेल्या ३३ सामन्यांत आठ शतके सलामीवीरांकडून नोंदवली गेली आहेत. ज्या संघाच्या सलामीवीरांनी सातत्याने खेळ केला, तेच संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीत पुढेही दिसत आहेत. त्यामुळे सलामीवीरांचे महत्त्व या विश्वचषकाच्या निमित्ताने पुन्हा अधोरेखित होत आहे.
यंदाच्या विश्वचषकातील सलामीवीरांच्या कामगिरीवर नजर टाकल्यास ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरचे नाव नक्कीच प्रथम क्रमांकावर येईल. सिडनीत जन्मलेल्या ३२ वर्षीय वॉर्नरला २०१८मध्ये चेंडू फेरफार प्रकरणाचा मुख्य नायक म्हणून एका वर्षांसाठी निलंबित करण्यात आले. त्यानंतर मात्र वॉर्नरने मागे वळून पाहिले नाही. विश्वचषकापूर्वी झालेल्या ‘आयपीएल’मध्ये तब्बल आठ अर्धशतके आणि एका शतकासह ६९२ धावा फटकावून त्याने ‘ऑरेंज कॅप’ पटकावली. विश्वचषकात आतापर्यंत दोन शतके व तीन अर्धशतके झळकावून वॉर्नरने चाहत्यांच्या हृदयात पुन्हा एकदा जागा निर्माण करण्यासाठी प्रयत्न केला आहे.
विश्वचषक सुरू होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा आरोन फिंच सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत पहिल्या तीन खेळाडूंमध्ये असेल, असे भाकित कोणीही वर्तवले नसते. परंतु ३२ वर्षीय फिंचने कर्णधाराला साजेशी कामगिरी करत आतापर्यंत दोन शतके आणि तीन अर्धशतके साकारून सर्वाची तोंडे बंद केली. मुख्य म्हणजे स्टीव्ह स्मिथ आणि वॉर्नर हे दोन महत्त्वाचे खेळाडू परतल्यानंतरही ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाने फिंचवरील विश्वास कायम ठेवत त्याला कर्णधारपद सोपवले. फिंचनेसुद्धा हा विश्वास सार्थ ठरवत ऑस्ट्रेलियाला विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये तब्बल तीन द्विशतके झळकावणारा एकमेव फलंदाज म्हणजे भारताचा रोहित शर्मा. विराट कोहली इतकाच परिपूर्ण फलंदाज असूनही रोहितला त्याच्यासारखे कामगिरीत सातत्य राखता आले नव्हते. मात्र यंदाच्या विश्वचषकात चाहत्यांना रोहितचे नवे रूप पाहायला मिळाले. २११ एकदिवसीय सामन्यांचा अनुभव गाठीशी असलेल्या रोहितने आतापर्यंत दोन शतके व एक अर्धशतक साकारले आहे. त्यातच शिखर धवन दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडल्यामुळे रोहितवरील जबाबदारी अधिक वाढली असून भारताला विश्वविजेतेपद मिळवायचे असल्यास रोहितचे योगदान फार बहुमूल्य ठरेल.
याव्यतिरिक्त, इंग्लंडचा जेसन रॉय, जॉनी बेअरस्टो, श्रीलंकेचा दिमुथ करुणारत्ने, वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल आणि दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डी’कॉक यांनीसुद्धा ठरावीक सामन्यांमध्ये धडाकेबाज खेळी साकारल्या आहेत. त्यामुळे स्पर्धेच्या शेवटी सलामीवीरांपैकीच कोणी सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार पटकावल्यास वावगे वाटणार नाही.
यापूर्वीच्या विश्वचषकातही सलामीवीरांचेच वर्चस्व
१९७५ ते २०१५मध्ये झालेल्या ११ विश्वचषकांदरम्यान सलामीवीरांचे वर्चस्व दिसून आले आहे. न्यूझीलंडचा मार्टिन क्रो, श्रीलंकेचा सनथ जयसूर्या आणि भारताचा सचिन तेंडुलकर यांनी अनुक्रमे १९९२, १९९६ आणि २००३च्या विश्वचषकातील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार मिळवला. विश्वचषकात आतापर्यंत तब्बल १३२ वेळा सलामीवीर सामनावीर पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. त्याचप्रमाणे एकाच विश्वचषकात सर्वाधिक ६७३ धावा आणि विश्वचषकातील सर्वाधिक २,२७८ धावा यासुद्धा सचिनच्या म्हणजेच सलामीवीराच्या नावावर आहेत. याचप्रमाणे एका सामन्यातील सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टिन गप्टिलच्या (२३७ वि. वेस्ट इंडिज, २०१५) नावावर आहे.
कसोटी सामना असो अथवा एकदिवसीय, इंग्लंडच्या खेळपट्टय़ांवर धावा करणे नेहमीच आव्हानात्मक असते. ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका या देशांच्या तुलनेत इंग्लंडमध्ये आजही सुरुवातीची १०-१५ षटके चेंडू मोठय़ा प्रमाणावर स्विंग होतो. त्यामुळे सलामीवीरांना संयम बाळगण्याबरोबरच धावगतीकडेसुद्धा लक्ष ठेवावे लागते. वॉर्नर किंवा रोहित यांच्यातूनच एक जण यंदाच्या विश्वचषकात सर्वाधिक धावा करेल.
– वसिम जाफर, सलामीवीर फलंदाज