दक्षिण आफ्रिकेशी आज झुंजणार

मँचेस्टर : आठपैकी सात सामने जिंकून आत्मविश्वास उंचावलेल्या ऑस्ट्रेलियाला शनिवारी होणाऱ्या अखेरच्या साखळी सामन्यात दक्षिण आफ्रिकेशी झुंजावे लागणार आहे. दक्षिण आफ्रिकेची विश्वचषकातील कामगिरी काहीशी निराशाजनक झाली असली तरी गेल्या १० पैकी आठ सामन्यांत त्यांनी कांगारूंना धूळ चारली आहे. त्यामुळे मनोधैर्य खचलेल्या आफ्रिकेचा सामना करताना ऑस्ट्रेलियाला अग्रस्थानासाठीची लढाई जिंकावी लागणार आहे.

दक्षिण आफ्रिकेला दुखापती आणि प्रमुख खेळाडूंचे अपयश भोवत आहे. काही सामन्यांत ख्रिस मॉरिस, रास्सी व्हॅन डर डय़ुसेन आणि इम्रान ताहिर यांनी बऱ्यापैकी योगदान दिले होते; पण हाशिम अमला, आरोन फिंच, क्विंटन डी’कॉक आणि जेपी डय़ुमिनी हे अव्वल फलंदाज सपेशल अपयशी ठरल्याने दक्षिण आफ्रिकेच्या चिंता वाढल्या आहेत. आठपैकी फक्त दोन सामन्यांत विजय मिळवता आल्याने चार वेळा विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठणाऱ्या दक्षिण आफ्रिकेची आठव्या क्रमांकावर घसरण झाली आहे.

वॉर्नर, स्टार्क बहरात

बंदीनंतर पुनरागमन करणारा डेव्हिड वॉर्नर सध्या तुफान कामगिरी करत असून त्याने आतापर्यंत आठ सामन्यांत ५१६ धावा फटकावल्या आहेत. त्याचबरोबर प्रतिस्पर्धी फलंदाजांमध्ये धडकी भरवणाऱ्या मिचेल स्टार्कने आतापर्यंत २४ बळी आपल्या नावावर केले आहेत. वॉर्नर, स्टार्क आणि रोहित शर्मा या तिघांनीच आतापर्यंत सर्वाधिक वेळा सामनावीराचा पुरस्कार पटकावला आहे. न्यूझीलंडविरुद्ध शानदार खेळी करून अ‍ॅलेक्स केरीने आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.

सामना क्र. ४५

ऑस्ट्रेलिया वि. दक्षिण आफ्रिका

’स्थळ : ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर  ’सामन्याची वेळ : सायं. ६ वा.

’थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स २ एचडी, स्टार स्पोर्ट्स ३

ताहिरला विजयी निरोप?

लेग-स्पिनर इम्रान ताहिर आपल्या कारकीर्दीतील अखेरचा एकदिवसीय (१०७वा) सामना शनिवारी खेळणार आहे. त्याला विजयी निरोप देण्यासाठी दक्षिण आफ्रिका संघ उत्सुक आहे. पाकिस्तानात जन्मलेल्या पण दक्षिण आफ्रिकन मुलीशी लग्न केलेल्या ताहिरने वयाच्या ३२व्या वर्षी फेब्रुवारी २०११ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.