तुषार वैती

यंदाच्या विश्वचषकात धावांची आणि विशेष करून षटकारांची आतषबाजी होईल, अशी चर्चा सर्वत्र आहे. इंग्लंडने त्यासाठी लिखित धावफलकात सुधारणा करून ५०० धावांचा आकडा समाविष्ट केला. पहिल्या १० दिवसांत कोणत्याही संघाला ३५० धावांचा टप्पा ओलांडता आला नसला तरी यापुढे धावांचे इमले रचले जातील, अशी शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच उत्तुंग षटकार ठोकणाऱ्या खेळाडूंची नयनरम्य फटकेबाजी पाहणे, ही यंदाच्या विश्वचषकात चाहत्यांसाठी पर्वणीच ठरणार आहे.

एकदिवसीय क्रिकेटचे स्वरूप बदलत गेले तसतसा खेळाडूंच्या मानसिकतेत, फलंदाजीच्या शैलीत बदल होत गेला. सुरुवातीला संयमी, सावध आणि नजाकतपूर्ण फलंदाजी करण्यावर फलंदाजांचा भर असायचा; पण फलंदाजांची मानसिकता बदलली आणि त्याची जागा उत्तुंग फटक्यांनी घेतली. त्यासाठी वैविध्यपूर्ण फटक्यांचा नवीन आविष्कार जन्माला आला. बॅटमध्ये बदल झाले, सीमारेषेमधील अंतर कमी झाले तसेच हिरव्यागार खेळपट्टय़ांची जागा पाटा खेळपट्टय़ांनी घेतली. सुरुवातीपासूनच चेंडूवर घणाघात चढवायचा आणि चेंडूला प्रेक्षकांमध्ये पाठवण्याच्या फलंदाजांच्या मानसिकतेमुळे जगभरातील फलंदाजांचा धसका गोलंदाजांनी घेतला. ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या उदयानंतर तर क्रिकेटचा चेहरामोहराच बदलून गेला. त्यामुळेच उत्तुंग फटकार ठोकणाऱ्या फलंदाजांना महत्त्व प्राप्त झाले.

१९७५च्या विश्वचषकात संपूर्ण सामन्यात एखाद-दुसरा षटकार सोडला, तर तंत्रशुद्ध फलंदाजीच पाहायला मिळायची; पण सनथ जयसूर्या, ख्रिस गेल यांसारख्या आक्रमक फलंदाजांमुळे फलंदाजीची रूपरेषाच बदलून गेली. आता प्रत्येक सामन्यात षटकारांचा पाऊस पाहायला मिळत आहे. नुकताच ख्रिस गेलने विश्वचषकातील सर्वाधिक षटकारांचा विक्रम आपल्या नावावर केला. गेलच्या कामगिरीमुळेच वेस्ट इंडिजने एका डावात तब्बल १९ षटकार ठोकण्याचा विक्रम झिम्बाब्वेविरुद्ध (२००५ मध्ये) रचला. २०१५च्या विश्वचषकात एका सामन्यात सर्वाधिक धावांचा विक्रम न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात नोंदवला गेला. न्यूझीलंडने १५ आणि वेस्ट इंडिजने १६ षटकार ठोकत तब्बल ३१ षटकारांची नोंद केली होती.

अनेक फलंदाजांनी आपल्या उत्तुंग षटकारांच्या जोरावर विश्वचषक स्पर्धा गाजवल्या. त्यात दक्षिण आफ्रिकेचा एबी डी’व्हिलियर्स अग्रस्थानी होता. काही दिवसांपूर्वीच गेलने हा विक्रम मागे टाकला तरी रिकी पाँटिंग (ऑस्ट्रेलिया, ३१), ब्रेंडन मॅक्क्युलम (न्यूझीलंड, २९), हर्शेल गिब्स (दक्षिण आफ्रिका, २८), सनथ जयसूर्या (श्रीलंका, २७), सचिन तेंडुलकर (भारत, २७), सौरव गांगुली (भारत, २५), मॅथ्यू हेडन (ऑस्ट्रेलिया, २३), व्हिव्हियन रिचर्ड्स (वेस्ट इंडिज, २२) यांनीही आपल्या नयनरम्य फटकेबाजीने प्रेक्षकांची मने जिंकली.

यंदाच्या विश्वचषकात सर्वाचे लक्ष षटकारांचा बादशाह असलेल्या गेलकडे लागले असले तरी रोहित शर्मा, जोस बटलर, जॉनी बेअरस्टो, आंद्रे रसेल, मार्टिन गप्टिल हेसुद्धा आपल्या षटकारांच्या जोरावर सामन्याला कलाटणी देण्यासाठी सज्ज आहेत. २०१५च्या विश्वचषकातील सर्वाधिक धावा फटकावणाऱ्या गप्टिलने वेस्ट इंडिजविरुद्धच्या नाबाद २३७ धावांच्या खेळीत तब्बल ११ षटकारांची आतषबाजी केली होती. गप्टिलची ही विश्वचषकातील सर्वोत्तम तर एकदिवसीय क्रिकेटमधील रोहित शर्मानंतरची (२६४) सर्वाधिक धावांची खेळी ठरली होती. याच विश्वचषकात गेलने झिम्बाब्वेविरुद्ध १६ षटकारांचा पाऊस पाडत विश्वचषकातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक २१५ धावांची खेळी केली होती. शाहिद आफ्रिदीनंतर (३५१) सर्वाधिक ३१७ षटकार आपल्या नावावर करणारा गेल पुन्हा एकदा चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी उत्सुक आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये तब्बल तीन वेळा द्विशतकी खेळी तसेच सर्वाधिक धावा फटकावणारा रोहित सध्या चांगल्याच लयीत आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये २१८ षटकार ठोकणाऱ्या रोहितने २०१५च्या विश्वचषकानंतर १३० षटकारांचा पाऊस पाडला आहे.

‘‘सौरव गांगुलीमध्ये चेंडूला सीमारेषेपार नव्हे तर स्टेडियमबाहेर पोहोचवण्याची क्षमता आहे. फिरकीपटूंचा तो कर्दनकाळ आहे,’’ हे व्ही. व्ही. एस. लक्ष्मणचे उद्गार अनेक फलंदाजांसाठी तंतोतंत लागू पडतात. २०११च्या विश्वचषकात महेंद्रसिंह धोनीने अंतिम सामन्यात मारलेला अखेरचा षटकार चाहते कधीही विसरू शकणार नाहीत. तशाच षटकारांची पर्वणी यंदाच्या विश्वचषकातही पाहायला मिळू शकते.