मंगळवारी मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदानावर रंगणाऱ्या पहिल्या उपांत्य लढतीत भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ यंदाच्या विश्वचषकात पहिल्यांदाच एकमेकांशी भिडणार आहेत. भारताची आघाडीची फलंदाजीची फळी विरुद्ध न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाजीचा मारा असा हा सामना रंगणार आहे. पण या सामन्यात पावसाचा व्यत्यय येण्याची शक्यता आहे हवामान खात्याने ९ आणि दहा तारखेला मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. आज मंगळवारी मॅन्चेस्टरमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे सामना उशीरा सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र, मुसळधार पाऊस झाल्यास आजचा दिवस पाण्यात जाण्याची शक्यता आहे.

स्थानिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यादरम्यान मुसळधार पावसाची दाट शक्यता आहे. दुपारी थोड्याप्रमाणात आभाळ कोरडे राहणार असून ऊन पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज सामना उशीराने सुरू होऊ शकतो. पण दिवसभर हलक्या सरींची शक्यता आहे. जर राखीव दिवशी सामना खेळवण्याची वेळ आल्यास, त्यादिवशीही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ही खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल असली तरी फिरकीपटूंनाही योग्य मदत मिळेल.

(आणखी वाचा : पावसामुळे भारत- न्यूझीलंड सामनाच झाला नाहीतर ‘हा’ संघ जाणार अंतिम फेरीत)

सामना ५०षटकांचा होण्याची शक्यता आहे. मात्र, मध्येच पावसाच्या सरीमुळे सामन्यात व्यत्यय येऊ शकतो. वातावरण ढगाळ राहिल्यास चेंडू स्विंग होऊ शकतो. साखळी सामन्यात भारत आणि पाकिस्तानचा सामना याच मैदानावर खेळला गेला होता. त्यावेळीही पावसाने व्यत्यय आणला होता. हा सामना भारताने डकवर्थ लुईसच्या नियमांप्रमाणे ८९ धावांनी जिंकला होता.

क्रिकेटचा इतिहास पाहिल्यास २०१९ च्या विश्वचषकात सर्वाधिक सामने पावसामुळे धुतले गेले आहेत. ऐवढे सामने याआधी कोणत्याही विश्वचषक स्पर्धेत रद्द झाले नाहीत. विश्वचषकात पावसामुळे सामने रद्द झाले त्याचा फटका गुणतालिकेत अनेक संघाना बसला आहे.