मुंबईच्या वानखेडे मैदानावर चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे दोन संघ आज आमनेसामने आले आहेत. महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहली या भारताच्या माजी-आजी कर्णधारांमध्ये ही लढत होत आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून चेन्नईने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मागील मोसमात संघाबाहेर असणाऱ्या सुरेश रैनाने या सामन्यात बंगळुरूच्या यजुर्वेंद्र चहलला षटकार ठोकत मोठा विक्रम नोंदवला आहे.

 

आयपीएलच्या इतिहासात २०० षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांमध्ये रैनाने स्थान मिळवले आहे. डावाच्या १०व्या षटकात रैनाने चहलला षटकार ठोकला. त्यामुळे आयपीएलमध्ये २०० षटकार मारणारा तो सातवा फलंदाज ठरला आहे. तर, रोहित शर्मा विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनीनंतर २०० षटकार ठोकणारा रैना चौथा भारतीय क्रिकेटपटू आहे. बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात रैनाने ३ षटकार आणि एका चौकारांसह २४ धावा केल्या.

रैनाची कारकीर्द

सुरेश रैनाने मागील वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याने २००५ ते २०१८ या काळात भारताकडून १८ कसोटी, २२६ एकदविसीय आणि ७८ टी-२० सामने खेळले आहेत. यात त्याच्या नावावर अनुक्रमे ७६८, ५६१५, १६०५ धावा  आहेत.

IPLमध्ये सर्वाधिक षटकार

  • ३५४ – ख्रिस गेल
  • २४० – एबी डिव्हिलियर्स
  • २२२ – रोहित शर्मा
  • २१७ – एमएस धोनी
  • २०४ – विराट कोहली
  • २०२ – कायरन पोलार्ड
  • २०२ – सुरेश रैना
  • १९९ – डेव्हिड वॉर्नर</li>