काश्मीरच्या अनंतनाग शहरात गेल्या ४९ दिवसांपासून लागू असलेली संचारबंदी उठवण्यात आली आहे. काश्मीर खोऱ्याच्या इतर काही भागांत मात्र संचारबंदी कायम आहे. फुटीरतावाद्यांनी लष्कराच्या बदामीबाग येथील कार्यालयावर मोर्चा नेण्याची योजना आखली होती, त्यामुळे श्रीनगरमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अनंतनाग शहरात आज सकाळपासून संचारबंदी उठवण्यात आली असून, प्रतिबंधात्मक आदेश म्हणजे लोकांनी एकत्र जमवण्यावरची बंदी कायम आहे. पोलिसांनी सांगितले, की दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग येथे ९ जुलैपासून संचारबंदी उठवण्याची ही पहिलीच वेळ आहे. हिज्बुल मुजाहिद्दीनचा कमांडर बुरहान वानी हा ८ जुलैला चकमकीत मारला गेल्यानंतर तेथे संचारबंदी ९ जुलैपासून लागू केली होती. अधिकाऱ्यांनी सांगितले, की श्रीनगरमध्ये संचारबंदी लागू असून, दक्षिण काश्मीरमधील पुलवामा व पाम्पोर येथीही ती लागू आहे. काश्मीर खोऱ्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. फुटीरतावाद्यांनी बदामीबाग कॅन्टोन्मेंट येथे लष्कराच्या मुख्यालयावर मोर्चा नेण्याचे ठरवले होते. लागोपाठ पन्नासाव्या दिवशी संचारबंदी, र्निबध, फुटीरतावाद्यांचा बंद यामुळे जनजीवन विस्कळीत होते. दुकाने, खासगी कार्यालये व शैक्षणिक संस्था तसेच पेट्रोल पंप बंद होते. सरकारी कार्यालये व बँकांत उपस्थिती कमी होती. मोबाइल इंटरनेटही खोऱ्यात बंद होते. आउटगोइंग सेवाही बंद होती. फुटीरतावादी गट नागरिकांच्या हत्यांविरोधात आंदोलन करीत आहे. त्यांनी बंदचा कालावधी १ सप्टेंबपर्यंत वाढवला आहे. बुरहान वानी याच्या चकमकीतील मृत्यूनंतर हिंसाचारात दोन पोलिसांसह ६८ जण मारले गेले आहेत. ९ जुलैपासून सुरू असलेल्या हिंसाचारात अनेक लोक जखमीही झाले आहेत.
भारत व पाकने काश्मीरसह सर्व मुद्दय़ांवर चर्चा सुरू ठेवावी – अमेरिका
वॉशिंग्टन : भारत व पाकिस्तान या दोन्ही देशांनी काश्मीर प्रश्नासह सर्व मुद्दय़ांवर संवादाची प्रक्रिया सुरू ठेवणे गरजेचे आहे, असे मत अमेरिकेने व्यक्त केले आहे. दोन्ही देशांनी प्रक्षोभक वक्तव्ये करण्याचे टाळावे असा सल्लाही अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने दोन्ही देशांना दिला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले, की दोन्ही देशांनी संवाद सुरू ठेवावा. दोन्ही देशांतील तणाव दूर करण्यासाठी दोन्ही चर्चा बंद करता कामा नये. अमेरिकी अधिकाऱ्याने सांगितले, की काश्मीरप्रश्नाशी संबंधित इतर प्रश्नही आहेत तेही संवादाच्या मार्गाने सोडवावेत. अमेरिकेच्या भूमिकेत कुठलाही बदल झालेला नाही. दोन्ही देशांनी संवादाची प्रक्रिया पुढे सुरू ठेवावी असे आमचे मत आहे. त्यातूनच दोन्ही देशांतील प्रश्न सुटू शकतील.