BJP MLA Nand Kishore Gurjar: भाजपाचे आमदार नंद किशोर गुर्जर यांनी पोलीस उपायुक्तांना फोन करून एक अजब मागणी केली आहे. बकरी ईदच्या आधी हिंडन एअरपोर्टच्या आसपास असलेल्या परिसरातील मटणाची दुकाने आणि कत्तलखाने बंद ठेवण्याची मागणी केली आहे. लोन विधानसभेचे आमदार नंद किशोर गुर्जर यांनी मागणी केली की, लोनी प्रशासनाने एअरक्राफ्ट परिसरात पशुधन कायद्याची अंमलबजावणी करत गोवंश किंवा इतर कोणत्याही प्राण्याचा बळी दिला जाणार नाही, याची खातरजमा करावी.
भाजपा आमदार गुर्जर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक व्हिडीओ आणि पत्रही शेअर केले आहे. ज्यामध्ये त्यांनी लिहिले की, लोनी परिसर हा हवाई उड्डाणाच्या क्षेत्रात येतो. यासाठी उड्डाणाच्या क्षेत्रातील १० किमी अंतरावर एकही कत्तलखाना किंवा मांसाचे दुकान आणि मांसाहारी हॉटेल असता कामा नये. कत्तलखान्यात प्राण्यांचे रक्त वाहते, त्यामुळे पक्षी आकर्षित होतात. पक्षी आल्यामुळे याआधीही इकडे एक विमान कोसळल्याची घटना घडली होती. यासाठी या परिसरातील कत्तलखाने बंद करायला हवेत.
नंद किशोर गुर्जर यांनी पुढे म्हटले की, एअरफोर्स परिसरात जर बकरी ईदच्या दिवशी बेकायदेशीर कत्तली करण्यात आला तर हे प्रकरण राष्ट्रद्रोहाशी जोडले जाईल. मागच्या वर्षी मुस्लीम बांधवांनी इको फ्रेंडली ईद साजरी केली होती. त्यांनी बकऱ्याच्या आकाराचा केक बनवून कापला होता. मला आशा आहे की, यावर्षीही ते असेच करतील. मात्र तरी काही लोकांनी जर जाणुनबुजून बकरे कापण्याचा प्रयत्न केला तर पोलिसांना माझे आवाहन आहे की, त्यांनी कडक कारवाई करावी.
बकरी ईद बाबत धीरेंद्र शास्त्री काय म्हणाले?
बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनीही बकरी ईदला होणाऱ्या कत्तलीचा विरोध केला आहे. ते म्हणाले, “मुक्या प्राण्यांची हिंसा कोणत्याही समाज, संस्कृती आणि धर्माला मान्य नाही. जनावरांचा बळी देणाऱ्या बकरी ईद सारख्या सणांचे आम्ही समर्थन करत नाहीत. जर आपण कुणाचे प्राण वाचवू शकत नसू, तर प्राण घेण्याचेही अधिकार आपल्याला नाहीत.”