नायक ते खलनायक आणि पुढे चरित्र अभिनेता अशा प्रदीर्घ कारकिर्दीतील अभिनयाने हिंदी चित्रपटांवर ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते प्राणकिशन सिकंद अर्थात ‘प्राण’ यांना प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार आज जाहीर करण्यात आला. वयाची नव्वदी पार केलेल्या या बुजुर्ग कलावंतास उशिरा का होईना, हा सन्मान घोषित झाल्याबद्दल चित्रपटक्षेत्राबरोबरच आम रसिकांमध्येही समाधानाची प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे.
चित्रपटसृष्टीत प्रदीर्घ काळ व मोलाची कामगिरी बजावणाऱ्या कलावंतास १९६९ पासून फाळके पुरस्काराने गौरवण्यात येते. प्राण यांना हा पुरस्कार दिला जावा अशी मागणी गेल्या काही वर्षांपासून करण्यात येत होती.
९३ वर्षीय प्राण यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे काही दिवसांपूर्वी इस्पितळात दाखल करण्यात आले होते. मात्र, प्रकृती सुधारल्यानंतर ते घरी परतले होते. चित्रपटसृष्टीत सत्तरहून अधिक वर्षे घालवलेल्या व सुमारे चारशे चित्रपटांमध्ये विविधरंगी भूमिका करणाऱ्या या ज्येष्ठ अभिनेत्यास दादासाहेब फाळके पुरस्कारापासून वंचित रहावे लागल्याबद्दल त्यांच्या चाहत्यांमध्ये नाराजीची भावना होती. तथापि, भारतीय चित्रपटाच्या शताब्दी वर्षांतच या चित्रपटाचे जनक दादासाहेब फाळके यांच्या नावाचा पुरस्कार घोषित झाल्याबद्दल प्राण यांच्या चाहत्यांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे.
१२ फेब्रुवारी १९२० रोजी दिल्लीत जन्मलेल्या प्राण यांनी १९४२ साली गायिका अभिनेत्री नूरजहानचा नायक म्हणून ‘खानदान’ या चित्रपटाद्वारे अभिनयक्षेत्रात पदार्पण केले. तेव्हापासून विविध प्रकारच्या भूमिकांद्वारे त्यांनी आपला ठसा उमटवला.
पन्नास व साठच्या दशकांत मुख्यत्वे खलनायकाच्या भूमिका रंगवणाऱ्या प्राण यांनी मनोज कुमार यांच्या ‘उपकार’ (१९६७) मधील ‘मलंगचाचा’ ही अपंग सहृदयी माणसाची व्यक्तिरेखा अशी काही रंगवली की तेथून त्यांचा कायापालटच झाला आणि त्यांच्या भूमिकांमध्ये वैविध्य आले.