खासदार मोहन डेलकर यांच्या मृत्यूनंतर दादरा नगर हवेतील लोकसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. यावेळी मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर या जागेवर निवडणूक लढवत आहे. मोहन डेलकर यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत त्यांच्या प्रचारासाठी दादरा नगर हवेलीच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

“दादरा नगर हवेलीचे नाव यायचे तेव्हा मोहन डेलकरांचेच नाव समोर यायचे. पण एक वेळ अशी आली की इतक्या मोठ्या नेत्यावरही अन्याय अत्याचार झाले. त्यांचे अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न झाला त्यानंतर मोहन डेलकर यांनी मुंबईत येऊन आत्मबलिदान दिले. शिवसेना पूर्ण ताकदीने डेलकर कुटुंबियांसोबत उभी आहे. हे कोणत्या सरकारसोबत किंवा भाजपासोबत भांडण नाही. इथल्या व्यवस्थेने एका नेत्याचा बळी घेतला. त्यांच्याविरोधात आमचे युद्ध आहे. सिल्वासा, दादरा नगर हवेलीला आजही स्वातंत्र्य मिळालेले नाही. आपले पंतप्रधान स्वातंत्र्यांचा अमृतमहोत्सव साजरा करत आहेत. इथले प्रशासन लोकांना गुलाम असल्याचे मानत आहे हे स्वातंत्र्य आहे का? इथल्या लोकांनी ठरवले आहे की, शिवसेनाच अशा लोकांसोबत लढू शकते,” असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

या पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी सर्वच भाजपा नेते आल्याचे पत्रकारने म्हटले त्यावर संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. “देशात काही काम उरले नसल्यामुळे संपूर्ण मंत्र्यांची फौज येथे आणून तुम्हाला काय सिद्ध करायचे आहे? या देशाचे रेल्वे मंत्री पाच दिवसांपासून इथे आहेत. जशी एअर इंडिया विकली तशी रेल्वेही विकली असेल. रेल्वे मंत्रालयाला काही काम नाही का? पश्चिम बंगालमध्येही संपूर्ण मंत्रीमंडळ गेले होते. पण तिथे ममतांचा विजय झाली. त्यामुळे सत्याचाच विजय होईल. कोणला आणायचे त्यांना घेऊन या. जो बायडेन यांना घेऊन या,” असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मी १५ वर्षापासून पाहत आहे मोहन डेलकर इथले प्रश्न उपस्थित करत होते. पण आता सर्व बंद आहे. प्रशासनाकडे हुकूमशाही पद्धीतने सर्व ताकद दिली तर निवडणुकांना काही अर्थच नाही. लोकप्रतिनिधींचा आवाज तुम्ही दाबत असाल तर स्वातंत्र्यांचा कोणता अमृत महोत्सव तुम्ही साजरा करत आहात. प्रशासनाने इथल्या लोकप्रितिनिंधीचे ऐकायला हवं,” असे संजय राऊत म्हणाले.