‘ते’ गोमांस नव्हे, बकऱ्याचे मटण

अखलाखच्या घरातून जप्त केलला मांसाचा तुकडा म्हणजे बकऱ्याचे मटण होते असा निर्वाळा दिला आहे.

उत्तर प्रदेशातील दादरी येथे घडलेल्या घटनेत बिसरा खेडय़ात अखलाख नावाच्या मुस्लीम व्यक्तीस गाईचे मांस सेवन केल्याच्या संशयावरून जमावाने ठार मारले होते.

दादरीप्रकरणी प्रयोगशाळेतील तपासणीचा निष्कर्ष
उत्तर प्रदेशातील दादरी येथे घडलेल्या घटनेत बिसरा खेडय़ात अखलाख नावाच्या मुस्लीम व्यक्तीस गाईचे मांस सेवन केल्याच्या संशयावरून जमावाने ठार मारले होते. या व्यक्तीच्या घरातील शीतकपाटात सापडलेला मांसाचा तुकडा हा बकऱ्याच्या मांसाचा होता, असे आता प्रयोगशाळेतील तपासणीत निष्पन्न झाले आहे.
सोमवारी तपासातील प्राथमिक निष्कर्ष जाहीर करण्यात आले आहेत. यावर्षी सप्टेंबरमध्ये अखलाख याच्या घरात गाईचे मांस असल्याची अफवा उठली होती. त्यानंतर जमावाने या पन्नास वर्षांच्या मुस्लिमास त्याच्या मुलीदेखत बाहेर फरपटत नेऊन लाथाबुक्क्य़ांनी तुडवून ठार केले होते. उत्तर प्रदेशातील गौतमबुद्धनगर जिल्ह्य़ात दादरी येथील सरकारी पशुवैद्यकीय रूग्णालयाच्या उपमुख्य अधिकाऱ्यांनी अखलाखच्या घरातून जप्त केलला मांसाचा तुकडा म्हणजे बकऱ्याचे मटण होते असा निर्वाळा दिला आहे. प्रकरण क्रमांक २४१/५ तारीख २९/९/२०१५ अन्वये जरचा पोलीस ठाण्याचे उप निरीक्षक तेजपालसिंग यांच्या विनंतीवरून पोलिसांनी जप्त केलेल्या मांसाच्या तुकडय़ाबाबत मी अहवाल सादर करीत आहे असे अधिकाऱ्याने म्हटले आहे. अहवालात म्हटले आहे की, सदर मांसाचे तुकडे ४-५ किलो वजनाचे होते व ते अनारोग्यकारक होते. त्याचा रंग लाल होता, त्याला सडल्याचा वास येत होता. त्यात पांढरी चरबीही होती. हे मांसाचे तुकडे प्राण्याच्या मागच्या पायाचे होते. माझ्या चाचणीनुसार ते बकरीचे मांस होते व तरी अंतिम तपासणीसाठी त्याचे नमुने मथुरा येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून उरलेल्या मांसाची विल्हेवाट लावण्यास पोलिसांना सांगितले आहे.
अखलाखच्या घरात गाईचे मांस सेवन केले जात आहे, असे मंदिरातील ध्वनिक्षेपकावरून जाहीर करण्यात आले. त्यामुळे २८ सप्टेंबरच्या रात्री दोनशे जणांचा जमाव त्याच्या घरावर चाल करून गेला व त्याला ठार केले. त्याचा मुलगा दानिश यात जखमी झाला. पोलिसांनी या प्रकरणी भाजपच्या स्थानिक नेत्याच्या मुलासह दहा जणांवर गुन्हा दाखल करून अटक केली होती. त्यानंतरही एका गृहरक्षकासह आणखी सात जणांना अटक करण्यात आली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Dadri lynching akhlaqs fridge had mutton not beef