भारतमातेचे ऋण प्रत्येकाने फेडायलाच हवे, या गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्यावरून त्यांच्यावर पलटवार करण्याची संधी शुक्रवारी संयुक्त जनता दलाने साधली. मोदी हे गुजरातच्या मुख्यमंत्री पदावर कायम राहूनही भारतमातेचे ऋण फेडू शकतात, या शब्दांत जनता दलाचे सरचिटणीस शिवानंद तिवारी यांनी मोदी यांना प्रत्युत्तर दिले.
पंतप्रधान होण्याची अनेक राजकीय नेत्यांची इच्छा आहे. ज्यांच्याकडे कुठे ना कुठे सत्ता आहे, ते तर जास्तच इच्छूक आहेत. आता सत्ता कुणाला मिळते, हे २०१४मधील निवडणुकीनंतरच समजेल. मात्र, भारतमातेचे ऋण फेडण्यासाठी पंतप्रधान होण्याचीच गरज नाही. मुख्यमंत्री पदावर कायम राहूनही मोदी हे काम करू शकतात. राज्याची सेवा म्हणजे एकपरीने देशाचीच सेवा आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार हेदेखील बिहारच्या माध्यमातून देशाचीच सेवा करताहेत, असे मत तिवारी यांनी मांडले.
जेव्हा कोणताही राजकारणी ऋण फेडण्याची भाषा करू लागतो, त्यावेळी त्याची दिल्लीच्या राष्ट्रीय राजकारणात प्रवेश करण्याची इच्छा स्पष्ट होते. पंतप्रधान पदासाठी इच्छूक असल्याचे मुलायमसिंह यादव यांनीही म्हटले होते. त्यामुळे अनेकजण पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आहेत, असे तिवारी यांनी सूचित केले.