रस्त्यावर अपघात झाला की बरेच जण धावून येतात. अपघात झालेल्या व्यक्तीला काही लागले का ते पाहतात. अगदी रूग्णालयातही पोहचवण्याची माणुसकी अनेकजण दाखवतात. मात्र राजधानी दिल्लीत माणुसकी संपलीच आहे का? लोकांना मृतदेहाकडे बघायलाही वेळ नाही का? असे प्रश्न निर्माण झाले आहेत. कारण NH 24 वर हिट अँड रनचा एक प्रकार घडला. एका माणसाला एका भरधाव वेगात येणाऱ्या कारने धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की ती व्यक्ती जागीच ठार झाली. यापेक्षा माणुसकीची सर्वात मोठी चेष्टा म्हणजे याच रस्त्यावरून जाणाऱ्या अनेक चारचाकी वाहनांनी भरधाव वेगात हा मृतदेह चिरडला. या मृतदेहाचे तुकडे २०० मीटरपर्यंत पसरले. त्यानंतर हे तुकडे एकत्र करून पोलिसांनी हा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना राजधानी दिल्लीत घडली.

दिल्लीत झालेल्या अपघातात जी व्यक्ती जागीच ठार झाली त्या व्यक्तीचे वय ३५ वर्षे असावे असा अंदाज व्यक्त होतो आहे. १० जानेवारीला पहाटे चार वाजण्याच्या सुमारास पांडव नगर भागात हा अपघात घडला. भरधाव कारची धडक लागलेली व्यक्ती जागीच ठार झाली आणि त्यानंतर या व्यक्तीच्या मृतदेहावरून अनेक कार गेल्या. मृतदेह चिरडला गेला. काही तासांनी जेव्हा पोलिसांना याबाबत माहिती मिळाली त्यानंतर हा मृतदेह पोलिसांनी गोळा केला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटू शकलेली नाही. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत व्यक्तीच्या हातात एक तंबाखूची पुडी मिळाली आणि या व्यक्तीने हातात लाल रंगाचा धागा बांधला होता. मृत झालेली व्यक्ती कोण आहे ? हे सांगणारी एकही वस्तू मृतदेहाजवळ मिळाली नाही.  मृतदेहाजवळ काही नाणी मिळाली. पोलिसांनी हे सगळे सामान ताब्यात घेतले आहे. ३५ वर्षांच्या युवकाचा मृत्यू भरधाव कारची धडक लागल्यानेच झाला आहे असे प्रथमदर्शनी दिसते असेही पोलिसांनी म्हटले आहे. तसेच मृतदेहाची ओळख पटविण्याचे कामही सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.