उत्तर-पश्चिम पाकिस्तानातील आदिवासी भागातील शिया समुदायाला लक्ष्य करून शुक्रवारी केलेल्या आत्मघाती हल्ल्यातील मृतांची संख्या शनिवारी ५७ वर पोहोचली आहे.
सध्या रमजानचा पवित्र महिना सुरू आहे. त्यामुळे इफ्तारच्या तयारीसाठी शुक्रवारी कुर्रम प्रांतातील पाराचिनार भागातील बाजारात नागरिकांनी गर्दी केली होती. ही संधी साधत दहशतवाद्यांनी दोन आत्मघाती स्फोट घडवून आणले.
कुर्रम प्रांताचे राजकीय प्रतिनिधी रियाझ मेहसूद यांनी सांगितले की, अज्ञात हल्लेखोरांनी पाराचिनार भागातील बाजार परिसरात दोन वेगवेगळे स्फोट घडवून आणले. या स्फोटांत मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले असून मृतांचा आकडा ५७ वर पोहोचला आहे. तर रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या जखमींपैकी रात्रभरात १२ जणांचा मृत्यू झाला असून, त्यामध्ये सात मुलांचाही समावेश असल्याचे रुग्णालय अधिकाऱ्यांनी सांगितले. स्फोटांतील १३० जखमींवर उपचार करण्यात आले असून, त्यातील २४ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये शिया समुदायाचे नागरिक  अधिक आहेत.
पाकिस्तानच्या एकूण लोकसंख्येच्या २० टक्के लोकसंख्या ही शिया समाजाची आहे. दरम्यान, या हल्ल्याची जबाबदारी कोणी स्वीकारली नसली, तरी तालिबान या क्षेत्रात अधिक सक्रिय आहे आणि त्यांच्याकडून नागरिकांना आणि सुरक्षा दलाच्या जवानांना लक्ष्य करून परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे बोलले जाते.