पीटीआय, नवी दिल्ली

‘डावपेचात्मक असलेले संतुलन ड्रोनच्या वापरामुळे कसे बिघडू शकते, हे जगभरातील सध्याच्या संघर्षांतून दिसते. त्यामुळे मानवरहित हवाई साधने (यूएव्ही) आणि ‘यूएव्ही’विरोधी यंत्रणांमध्ये आत्मनिर्भर होणे भारतासाठी सामरिकदृष्टय़ा अत्यावश्यक आहे,’ असे प्रतिपादन संरक्षण दलप्रमुख जनरल अनिल चौहान यांनी बुधवारी केले.

‘यूएव्ही’ आणि ‘यूएव्ही’विरोधी यंत्रणेसंबंधी परदेशातील कंपन्यांकडून आयात होणारी महत्त्वाची साधने देशांतच तयार करणे’ यावर आधारित कार्यशाळा एकत्रित संरक्षण विभागाचे (आयडीएस) मुख्यालय आणि संयुक्त युद्धपद्धती अभ्यास केंद्राच्या वतीने नवी दिल्लीत माणेकशॉ केंद्रामध्ये पार पडली. या वेळी त्यांनी संबोधन केले. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या पार्श्वभूमीवर ही कार्यशाळा घेण्यात आल्याचे संरक्षण मंत्रालयाने सांगितले. कार्यशाळेचे उद्घाटन सीडीएस जनरल चौहान यांच्या हस्ते झाले. ते म्हणाले, ‘ड्रोन्स हे आजच्या घडीचे वास्तव आहे. देशी बनावटीच्या, आपला भूभाग पाहून, आपल्या गरजेनुसार तयार केलेल्या ‘यूएव्ही’ आणि ‘यूएव्ही’विरोधी यंत्रणा किती महत्त्वाच्या आहेत, हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने दाखवून दिले. आपण आक्रमण आणि बचावासाठी आयात तंत्रज्ञानावर अवलंबून राहू शकत नाही. परदेशावरील अवलंबित्वामुळे आपली युद्धसज्जता दुर्बल होते, आपल्या उत्पादन क्षमतांना मर्यादा येते. याचा परिणाम संरक्षण साहित्याचे महत्त्वाचे सुटे भाग अपुरे पडण्यामध्ये होतो.’

‘स्फोटकविरहित ड्रोन्सचा पाकिस्तानकडून मारा’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

असमान ड्रोन युद्धांमुळे मोठय़ा स्तरावरील लष्करी यंत्रणांना धोका निर्माण झाल्याचे चौहान म्हणाले. हवाई सिद्धांतांतील संकल्पनात्मक बाजूंचा लष्कराला पुनर्विचार करावा लागत आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान पाकिस्तानने स्फोटकविरहित ड्रोनचा १० मे रोजी वापर केला. पण, त्याने भारतातील कुठल्याही लष्करी अथवा नागरी क्षेत्राचे नुकसान झाले नाही. पाकिस्तानने डागलेली अनेक ड्रोन्स निकामी करण्यात आली. ही ड्रोन्स नंतर अगदी आहे तशा स्थितीत आढळून आल्याचे त्यांनी सांगितले.