एपी, बीरशेबा (इस्रायल)
इस्रायल आणि इराणमधील संघर्षाची तीव्रता वाढली असून, इराणने डागलेल्या क्षेपणास्त्रात इस्रायलच्या दक्षिण भागातील मुख्य रुग्णालय उद्ध्वस्त झाले. तसेच, इतर काही क्षेपणास्त्रांनी इस्रायलमधील उंच इमारती आणि इतर नागरी भागांना लक्ष्य केले. यात इस्रायलमधील ४० जण जखमी झाले. या हल्ल्यांनंतर इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांचे अस्तित्वही उरणार नाही, असा इशारा इस्रायलचे संरक्षणमंत्री इस्रायल कॅट्झ यांनी दिला. दरम्यान, इस्रायलनेही इराणच्या अरक या घन जल अणुभट्टीला लक्ष्य केले. इराण-इस्रायल संघर्षाचा हा सातवा दिवस होता.
इस्रायलच्या दक्षिण भागातील बीरशेबा येथे सोरोका वैद्याकीय केंद्र आहे. इराणच्या हल्ल्यानंतर या केंद्रातून मोठ्या प्रमाणावर धूर येताना दिसला. आपत्कालीन पथकाने रुग्णांना सुरक्षित स्थळी हलविले. या हल्ल्यात कुणीही गंभीर जखमी झाले नाही. ‘इराणसारख्या देशावर खामेनींसारखे हुकुमशहा राज्य करतात.
इस्रायलच्या विनाशाची मोहीम ते हाती घेतात. ते आता अस्तित्वात राहू शकत नाहीत. लष्कराला सूचना दिल्या आहेत आणि लष्कराला याची पूर्ण कल्पना आहे, की सर्व उद्दिष्टे साध्य करण्यासाठी ही व्यक्ती अजिबात अस्तित्वात राहता कामा नये,’ असे इस्रायलचे संरक्षणमंत्री इस्रायल कॅट्झ म्हणाले. इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी रुग्णालयावरील हल्ल्याचा निषेध केला आणि तेहरानमधील जुलमी शासकांकडून आम्ही याची किंमत वसूल करू, असा इशारा दिला.
इस्रायलची आपत्कालीन परिस्थितीसाठी तयारी
इस्रायलने गेल्या आठवड्यापासून सर्व रुग्णालयांनी आणीबाणीच्या काळात कुठली तयारी करावी, यासाठी नियोजन केले आहे. त्यानुसार तळमजल्यांचे रूपांतर रुग्णालयात करण्यात आले आहे. ब्लड बँकेचीही सोय इस्रायलने केली आहे.
या समस्येवर रशियाने इराण, इस्रायल, अमेरिकेसमोर आपला प्रस्ताव ठेवला आहे. आम्ही कुणावर काहीही लादणार नाही. पण, या परिस्थितीतून कसा मार्ग काढता येईल, यावर आम्ही बोलत आहोत. तेथील नेत्यांनी अखेर निर्णय घ्यायचा आहे. – व्लादिमिर पुतिन, अध्यक्ष, रशिया