दिल्लीत आम आदमी पक्षाचे आमदार अनिल वाजपेयी यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी भाजपात प्रवेश केला आहे. आप आमदाराने भाजपात प्रवेश केल्याने अरविंद केजरीवाल यांना हादरा बसला आहे.
अरविंद केजरीवाल यांनी काही दिवसांपूर्वी भाजपावर घोडेबाजारचा आरोप केला होता. भाजपा दुसऱ्या पक्षांमधील आमदार फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचे केजरीवाल यांनी म्हटले होते. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी आम आदमी पक्षाचे आमदार अनिल वाजपेयी यांनी भाजपात प्रवेश केला आहे. वाजपेयी यांनी भाजपाचे उपाध्यक्ष आणि दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष श्याम जाजू आणि केंद्रीय मंत्री विजय गोयल यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. “मी १५ वर्ष आम आदमी पक्षासाठी काम केले. मात्र, पक्षात मला आदर मिळत नव्हता. आम आदमी पक्ष मार्ग भरकटलेला पक्ष आहे, असे त्यांनी सांगितले.
https://twitter.com/ANI/status/1124244899899961344
बुधवारी आपचे नेते मनीष सिसोदिया यांनी भाजपावर गंभीर आरोप केले होते. भाजपा आपच्या आमदारांना पक्ष सोडण्यासाठी १० कोटी रुपयांची ऑफर देत असल्याचे सिसोदिया यांनी म्हटले होते. यासंदर्भात प्रश्न विचारला असता वाजपेयींनी भाजपाकडून पैशांची ऑफर देण्यात आली नव्हती, असे सांगितले. केजरीवाल यांना आरोप करायची आणि मग माफी मागायची सवय आहे, असे वाजपेयींनी म्हटले आहे. वाजपेयी हे दिल्लीतील गांधीनगर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. यापूर्वी आपच्या दिल्लीतील तीन नगरसेवकांनीही भाजपात प्रवेश केला होता. त्यामुळे केजरीवालांच्या अडचणीत भर पडली आहे.