आपल्याकडे एक वाक्य प्रचलित आहे जेव्हा देव आपल्याला एखादे व्यंग देतो तेव्हा त्याबदल्यात त्या व्यंगावर मात करण्याची अद्भुत शक्ती देखील द्यायला तो विसरत नाही. हेच वाक्य दिल्लीच्या एका योगा आर्टिस्ट ग्रुपने सिद्ध करून दाखवल आहे. या ग्रुपमधले सगळेच विद्यार्थी दृष्टीहिन आहेत. अॅक्रोबेटिक योगावर या मुलांनी प्रभुत्त्व मिळवल्याने हा ग्रुप कौतुकासाठी पात्र तर ठरतोच आहे पण या ग्रुपनं थक्क करणारे योगासनाचे प्रकार करून देशातल्या अनेकांना प्रेरणा दिलीय.
पाहिला वहिला नॅशनल डिसअॅबेलिटी अॅवॉर्ड देखील  या ग्रुपनं पटकावला आहे. तसेच एमटीएनलच्या ‘परफेक्ट हेल्थ मेला’ची चॅम्पिअनशिप ट्रॉफीदेखील या ग्रुपनं मिळवली आहे.
योगा प्रशिक्षक हेमंत शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली या मुलांनी अवघड अशी कामगिरी सहज साध्य करून दाखवली आहे. चार वर्षांपूर्वी या विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणाला सुरूवात झाली, या विद्यार्थ्यांना फक्त आसनं यावीत इकताच उद्देश त्यांच्या प्रशिक्षकांचा होता. मात्र एक सामान्य मुलागादेखील ही आसनं जितक्या कमी वेळात शिकत नाही त्याहूनही कमी वेळात या मुलांनी सगळ्या गोष्टी आत्मसात केल्या असंही यांचे प्रशिक्षक शर्मा यांनी सांगितले.
खर तर योगा हा बघून शिकण्याचा प्रकार पण दुष्टी नसताना केवळ स्पर्श आणि सूचना ऐकून या सगळ्या मुलांनी हा प्रकार शिकला आणि जगाला दाखवून दिल कि शिकण्याची इच्छा असेल तर कोणतंच व्यंग संकट बनून तुम्हाला रोखू शकत नाही.