Delhi Car blast accused Umar Nabi with 2 others visited Turkey in 2022 : दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या बाहेर झालेल्या कार स्फोटाचा तपास वेगाने केला जात आहे. दरम्यान तपासकर्त्यांनुसार या हल्ल्या एका दहशतवादी नेटवर्कचा सहभाग असल्याचे दिसून येत आहे, ज्यामध्ये तीन काश्मीरी वैद्यकीय व्यावसायिकांचा सहभाग देखील समोर आला आहे.
वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या गाडीचा लाल किल्ल्याच्या जवळ स्फोट झाला ती चालवत असलेला डॉ. उमर यू नबी याने अन्य दोन व्यक्तींबरोबर तुर्कियेला भेट दिली होती. उमर याने मुझफर अहमद राथेर (कदाचित डॉक्टर) आणि डॉक्टर मुझम्मिल शाकील यांच्याबरोबर तुर्कियेला भेट दिली होती. हे तिघे मार्च २०२२ रोजी तुर्कियेला गेले होते, आणि दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ हे तेथे राहिले होते. येथे ते कथितपणे १४ जणांना भेटले. या सर्वांची ओळख तपसाली जात आहे, या १४ जणांपैकी एकजण हा उत्तर प्रदेशच्या सहारनपूर येथे अटक केलेल्या एका व्यक्तीचा भाऊ असल्याचे सांगितले जाते.
प्राथमिक तपासात आढळून आले आहे की, त्याने त्यांनी संपूर्ण मुक्कामासाठी हॉटेल घेतले नसावे, पण त्यांच्या प्रवासाच्या तपशिलातून याची अद्याप पुष्टी होणे बाकी आहे.
दिल्लीत स्फोट झालेली कार हा उमर यू नबी चालवत होता, त्यानेच स्फोट घडवून आणला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, इतर दोन डॉक्टरांनी या कटात सक्रिय मदत करण्याची भूमिका पार पाडली, त्यापैकी एकाने लॉजिस्टिक आणि भरतीमध्ये, तर दुसऱ्याने स्टोरेज आणि पायाभूत सुविधा पुरवण्यात मदत केली. न्यूज१८ने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.
२०२१ मध्ये दहशतवादाकडे वाटचाल?
वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टर उमर याच्या प्रवासाची माहिती समोर आल्यानंतर, तपासकर्त्यांना संशय आहे की त्याचा परदेशातील प्रवास हा २०२१ च्या शेवटच्या टप्प्यात सुरू झाला असावा. त्यानंतर मॉड्यूलमधील सर्व सदस्य एकमेकांशी जोडले गेले आणि त्यांनी तुर्कियेला जाण्याचा निर्णय घेतला.
इतर दहशतवादी प्रकरणांच्या उलट, या प्रकरणात मुख्य संशयितांनी पाकिस्तानला भेट दिली होती की नाही, हे सिद्ध करणारा कोणताही पुरावा अद्याप आढळलेला नाही.
डॉ. मुझफर अहमद राथेर हा जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील वुनपोराचा रहिवासी आहे, जो स्फोटानंतर सहारनपूर येथे अटक झालेल्या आदिलाच भाऊ असल्याचा संशय आहे.
