Amit Shah High-Level Meet On Delhi Blast : दिल्लीतील लाल किल्ला परिसरात काल (सोमवार) सायंकाळी एका कारमध्ये भीषण स्फोट झाला या स्फोटात ९ जणांचा मृत्यू झाला आहे. यांनंतर या घटनेमागील सर्व आरोपींना पकडण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत. यादरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर दिल्ली कार स्फोटाच्या तपासाचा आढावा घेण्यासाठी एक उच्च-स्तरीय बैठक घेतली.
या बैठकीत झालेल्या चर्चेबद्दल शाह यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत माहिती दिली आहे. “वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर दिल्ली कार स्फोटाचा आढावा घेण्यासाठी बैठका घेतल्या. या घटनेसाठी जबाबदार असलेल्या प्रत्येक आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले. या कृत्यात सहभागी असलेल्या प्रत्येकाला आपल्या यंत्रणांच्या रोषाला सामोरे जावे लागेल,” अशी पोस्ट अमित शाह यांनी केली आहे.
या बैठकीत केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन, इंटेलिजन्स ब्युरो(IB) चे संचालक तपन देका, दिल्ली पोलीस आयुक्त सतीश गोलचा आणि एनआयएचे डायरेक्टर जनरल सदानंद वसंत दाते हे उपस्थित होते. तसेच जम्मू आणि काश्मीरचे डीजीपी नलिन प्रभात यांनी व्हर्च्युअली या बैठकीला हजेरी लावली, असे वृत्त पीटीआयने दिले आहे.
या प्रकरणी एफआय आर दाखल
दिल्ली पोलिसींनी बेकायदेशीर कृत्य विरोधी कायदा आणि स्फोटक कायदा याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दिल्ली पोलिसांनी मंगळवारी बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) कायदा (UAPA) आणि स्फोटकांशी संबंधीत कायदा (Explosives Act) अंतर्गत एफआयआर दाखल केला आहे. यामध्ये दहशतवादी हल्ल्याचा कट रचणे आणि तो घडवून आणणे या संबंधित कलमांचा देखील समावेश केला आहे.
प्राथमिक तपासात दिल्ली स्फोट आणि फरीदाबाद येथे समोर आलेले टेरर मॉड्यूल यांचा संबंध सूचित करणारे धागेदोरे मिळाल्यानंतर दिल्लीत अनेक ठिकाणी छापेमारी करण्यात आली.
दिल्लीत हाय अलर्ट
दिल्लीत झालेल्या स्फोटानंतर शहरात हाय अलर्ट जारी करण्यात आला होता, ज्यामुळे शहरातील अनेक ठिकाणी जसे की विमानतळ, रेल्वे स्टेशन आणि बस टर्मनल्स या ठिकाणी तपासणी तीव्र करण्यात आली. तसेच पोलिसांकडून हॉटेल्स, गेस्ट हाऊस आणि बॉर्डर एन्ट्री पॉइंट्सवर विशेष लक्ष ठेवले जात आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुलवामा येथील एक डॉक्टर उमर मोहम्मद हा कथितपणे ह्युंदाई i20 कार चालवत होता. या कारचा लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या पार्किंगजवळ स्फोट झाला आहे. त्या भागातून मिळवलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्याचा फोटो समोर आला आहे. तसेच स्फोटाच्या काही क्षणांपूर्वी तो गाडी चालवत असल्याचे दिसून येत आहे.
