दिल्ली विधानसभा निवडणुकांचे निकालाचे प्राथमिक कल हाती येऊ लागले आहेत. दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी ८ फेब्रुवारी रोजी झालेल्या मतदानानंतर आज जाहीर होणाऱ्या निकालांमध्ये प्रमुख लढत ही भाजपा आणि अरविंद केजरीवाल यांच्या आपमध्ये असल्याचे चित्र प्राथमिक कलांमधून स्पष्ट होत आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली असून पहिल्या तासाभरामधील मतमोजणीनुसार अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने ५३ जागांवर आघाडी मिळवली आहे. तर १६ जागांवर भाजपाने आघाडी घेतली आहे. विशेष म्हणजे मागील दीड महिन्यापासून चर्चेत असणारा शाहीन बाग मतदारसंघ ज्या परिसरामध्ये आहे त्या ओखला मतदारसंघामध्ये भाजपाचा उमेदवार पिछाडीवर पडला असून आपच्या उमेदवाराने आघाडी मिळवली आहे.

ओखला मतदारसंघामधून आम आदमी पक्षाचे उमेदवार अमानतुल्ला खान आघाडीवर आहेत. मागील विधानसभा निवडणुकीमध्येही अमानतुल्ला खान यांनीच या मतदारसंघामधून विजय मिळवला होता. मागील दोन महिन्यांपासून शाहीन बाग परिसरामध्ये सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी विरोधात आंदोलन सुरु आहे. भाजपाने दिल्ली निवडणुकांमध्ये शाहीन बाग हा मुख्य मुद्दा बनवण्याचा प्रयत्न केला होता. अनेक वृत्तवाहिन्यांच्या चर्चा सत्रांमध्ये भाजपाचे नेते याच मुद्द्यावर चर्चा करताना दिसत होते.

आठ वाजता मतमोजणी सुरु झाल्यानंतर पहिल्या तासामध्ये आपने ५३ जागांवर आघाडी मिळवल्याचे चित्र दिसत असून बहुमताचा ३६ जागांचा आकडा आप सहज पार करेल असं चित्र सध्या दिसत आहे. पहिल्या तासाभरामध्ये भाजपाला १६ जागांवर आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे. मतदानोत्तर चाचण्यांचे सरासरी कौल शनिवारी मतदानाची वेळ संपल्यानंतर जाहीर केले. या सर्व चाचण्यांचे कौल ‘आप’च्या बाजूने झुकले असून एकूण ७० जागांपैकी ‘आप’ला ५० ते ५५ तर, भाजपला १५-२० जागा आणि काँग्रेसला दोन जागा मिळतील असा या चाचण्यांचा अंदाज आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.