Arvind Kejriwal Interim Bail : दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना १ जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान प्रचार करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी करणारी याचिका त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेवर ७ मे रोजी सुनावणी पार पडली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा निकाल निकाल राखून ठेवला होता.

आज न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दिपांकर दत्ता यांच्या खंडपीठाने यासंदर्भात निकाल दिला आहे. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना १ जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे. तसेच २ जून रोजी अरविंद केजरीवाल यांनी ईडीकडे आत्मसमर्पण करावे, असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.

यासंदर्भात बोलताना अरविंद केजरीवाल यांचे वकील शादान फरासत म्हणाले, “अरविंद केजरीवाल यांना १ जूनपर्यंत अंतरिम जामीन मिळाला आहे. ते सध्या तिहार तुरुंगात आहेत. आज ते तुरुंगातून बाहेर येतील, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.”

दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल २१ मार्च रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात जामीनसाठी अर्ज केला होता. मात्र, उच्च न्यायालयाने त्यांची जामीन याचिका फेटाळून लावली होती. त्यानंतर केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. तसेच लोकसभा निवडणुकीदरम्यान प्रचार करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती.

हेही वाचा – पंतप्रधान मोदींची शरद पवारांना खुली ऑफर; म्हणाले, “काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा एनडीएमध्ये या, तुमची सर्व…”

दरम्यान, गुरुवारी अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेला विरोध करत ईडीने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. या प्रतिज्ञापत्रात त्यांनी निवडणूक प्रचार हा मूलभूत अधिकार नाही, असे म्हटलं होते. तसेच केजरीवाल यांच्याकडून निवडणूक प्रचाराच्या नावाखाली तुरुगांतून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला जातो आहे, असा दावाही त्यांनी या प्रतिज्ञापत्रात केला होता. अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळाल्यास चुकीचा पायंडा पाडला जाईल, त्यामुळे अरविंद केजरीवाल यांनी जामीन देऊ नये, अशी मागणी ईडीकडून करण्यात आली होती.

दरम्यान, अरविंद केजरीवाल यांना मिळालेल्या जामीनानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत प्रतिक्रिया दिली. “अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन मिळल्याचे वृत्त ऐकताच आनंद झाला आहे. निवडणुकीच्या प्रचारात त्यांचा फायदा होईल”, असे त्या म्हणाल्या.