दिल्लीत धुक्यामुळे कारला झालेल्या अपघातात चार पॉवर लिफ्टरचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी पहाटे घडली. या अपघातात दोन जण जखमी झाले असून यात पॉवर लिफ्टिंगमधील वर्ल्ड चॅम्पियन सक्षम यादव या खेळाडूचाही समावेश आहे. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
पॉवर लिफ्टिंगमधील सहा खेळाडू शनिवारी रात्री पानिपत येथून खेळाडूंच्या एका बैठकीवरुन परतत होते. रविवारी पहाटे चारच्या सुमारास दिल्लीतील अलीपूर येथे धुक्यामुळे चालकाचा अंदाज चुकला आणि कार रस्त्यालगतच्या खांबावर जाऊन आदळली. यात चार खेळाडूंचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. हरीश, टिंकू आणि सुरज अशी या मृत्यू झालेल्या खेळाडूंची नावे आहेत. तर चौथ्या खेळाडूची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. सक्षम यादव आणि बाली या दोघांना गंभीर दुखापत झाली आहे.
Delhi: Four powerlifting players killed & two injured in a road accident due to fog conditions at Sindhu border in #Delhi ;Visuals from the spot pic.twitter.com/6Tam7H1UXm
— ANI (@ANI) January 7, 2018
‘खेळाडूंची स्विफ्ट कार एका ट्रकला ओव्हरटेक करत होती. याच दरम्यान विरुद्ध दिशेने एक कार आली. यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि हा अपघात झाला’ असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. धुक्यामुळे स्विफ्ट कारच्या चालकाला विरुद्ध दिशेने येणारी कार दिसली नसावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणात पोलिसांनी कारच्या चालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरु आहे, असे पोलिसांनी सांगितले.