हरयाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौताला यांना तातडीने शरण येण्यासंबंधी आदेश देण्याच्या याचिकेप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय) व चौताला यांना बुधवारी नोटिसा जारी केल्या.
ओमप्रकाश चौताला यांना न्यायालयासमोर शरण येण्यासाठी १७ दिवसांची अतिरिक्त मुदत मिळाली असून या कालावधीत प्रचारमोहिमेत सहभागी होण्यासाठी ते या जामिनाचा गैरवापर करण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच त्यांना तातडीने शरण येण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी विनंती करणारी याचिका ज्येष्ठ अ‍ॅडव्होकेट विवेक तंखा यांनी दिल्ली उच्च न्यायालयात केली आहे. चौताला यांनी आपल्या निवडणूक प्रचारमोहिमेचा कार्यक्रम आखला असून तशा बातम्याही वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाल्या आहेत, याकडे तंखा यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले. त्यावर चौताला यांच्या निवडणूक प्रचारमोहिमेची दखल तुम्ही का घेतली नाही, अशी विचारणा न्या. सिद्धार्थ मृदुल यांनी केली.
भाजपची तक्रार
शिक्षक नियुक्ती घोटाळ्याप्रकरणी ओमप्रकाश चौताला हे निवडणूक प्रचार मोहिमेत सहभागी होत असल्याची बाब आचारसंहितेचा भंग करणारी असून हा मुद्दा निवडणूक आयोगाच्या नजरेस आणून दिला जाईल, असे भाजपने म्हटले आहे.तुरुंगवासाची शिक्षा झालेली व्यक्ती प्रचारात सहभागी होऊ शकत नाही. अशा वेळी चौताला प्रचार करीत असतील तर ते बेकायदेशीर आणि चुकीचेही आहे , असे भाजपचे उपाध्यक्ष मुख्तार नक्वी यांनी सांगितले. आम्ही हा मुद्दा निश्चितपणे निवडणूक आयोगाकडे उपस्थित करणार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.