पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी करणाऱ्या काँग्रेस नेत्याच्या याचिकेवर सुनावणी करण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिला. याचिकाकर्त्याने कोविड-१९च्या ओमायक्रॉन विषाणूचा प्रकार वेगाने होत आहे म्हणत निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी केली होती.
उच्च न्यायालयाने काँग्रेस नेते जगदीश शर्मा यांची याचिका फेटाळून लावत याचिकाकर्ते मंगळावर राहत आहे का असा सवाल केला. याचिकेवर नाराजी व्यक्त करताना न्यायमूर्ती विपिन सांघी आणि जसमीत सिंग यांच्या खंडपीठाने सांगितले की, “ही एक फालतू याचिका आहे. तुम्ही मंगळावर राहत आहात का? दिल्लीत आता रुग्णांची कमी होताना दिसत आहेत. तुम्ही ती मागे घ्या नाहीतर आम्ही फेटाळून लावू,” असे म्हटले. त्यानंतर याचिकाकर्त्याच्या वकिलांनी याचिका मागे घेतली.
काँग्रेस नेते जगदीश शर्मा यांनी कोविड-१९ च्या तिसऱ्या लाटेबाबत माहिती देत निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती कोर्टाला केली होती. ओमायक्रॉन प्रकार वेगाने पसरत असल्याचे त्यांनी सांगितले होते. करोनाच्या तिसऱ्या लाटेत आवश्यक सेवांच्या वितरणासाठी योजना सादर करण्याचे निर्देश केंद्र आणि राज्य सरकारला देण्यात यावेत अशीही मागणी त्यांनी केली.
पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका
ऑक्सिजनची उपलब्धता आणि वितरणासाठी योजना सादर करण्याचे निर्देश सरकारांना द्यावेत आणि पाचही राज्यांतील निवडणुका काही आठवडे किंवा महिन्यांनी पुढे ढकलण्याचे निर्देश निवडणूक आयोगाला द्यावेत, अशी विनंती काँग्रेस नेते जगदीश शर्मा न्यायालयाला केली होती. उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, उत्तराखंड आणि मणिपूरमधील विधानसभा निवडणुका १० फेब्रुवारीपासून सुरू होत असून ७ मार्चला संपणार आहेत. १० मार्च रोजी निकाल जाहीर होणार आहेत.