दिल्ली उच्च न्यायालयाने घटस्फोटाच्या एका याचिकेवर सुनावणी करताना म्हटलं आहे की, पतीने त्याच्या पत्नीकडून घरातील कामं करण्याची अपेक्षा करण्याला क्रूरता म्हणता येणार नाही. तसेच एखाद्या महिलेला घरातील काम करण्यास सांगितलं तर त्याचा अर्थ असा नव्हे की तिला मोलकरणीसमान वागणूक दिली जातेय. बऱ्याचदा पती घरच्या आर्थिक जबाबदाऱ्या उचलतात तर पत्नी घरातील जबाबदारी स्वीकारते. घटस्फोटाची मागणी करणाऱ्या एका याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती सुरेश कुमार कैत आणि न्यायमूर्ती नीना बंसल यांच्या खंडपीठाने हे वक्तव्य केलं आहे.

घरातील कामांना क्रूरता म्हणत एका महिलेने तिच्या पतिकडे घटस्फोटाची मागणी केली होती. परंतु, कौटुबिक न्यायालयाने ही याचिका फेटाळली होती. त्यानंतर पत्नीचा पतीबरोबर असलेला व्यवहार चुकीचा आहे, असं म्हणत उच्च न्यायालयाने पतीच्या मागणीवर घटस्फोट मंजूर केला आहे. या जोडप्याचं २००७ मध्ये लग्न झालं होतं. या जोडप्याला १७ वर्षाचा एक मुलगा आहे.

पतीने न्यायालयासमोर म्हटलं होतं की, त्याची पत्नी त्याच्या कुटुबातील इतर सदस्यांशी नेहमी भांडायची, कुठल्याच गोष्टींवर त्यांच्यात कधी एकमत व्हायचं नाही. त्यामुळे घरात नेहमी तणावाचं वातावरण असायचं. तसेच पत्नी नेहमी वेगळं राहण्याची मागणी करायची. अखेर पतीने पत्नीच्या मागणीला झुकतं माप देत पत्नीबरोबर वेगळा संसार थाटला. परंतु, त्यानंतर काही दिवसांनी पत्नी तिच्या आई-वडिलांबरोबर माहेरी राहू लागली. पत्नीने पती नेहमी कामानिमित्त घराबाहेर राहत असल्याचं कारण पुढे केलं होतं. यावर न्यायालयाने म्हटलं आहे की, महिलेने वेगवेगळी कारणं देत तिचं सासरचं घर सोडून पतीला वेगळा संसार थाटायला लावला आणि त्यानंतर आपल्या आई-वडिलाबरोबर माहेरी राहू लागली.

हे ही वाचा >> “…तर परवाने घेऊन भटके श्वान सांभाळा”, न्यायालयाचा प्राणीप्रेमींना सल्ला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

न्यायालयाने याप्रकरणी निर्णय देताना म्हटलं आहे की, वैवाहिक बंध जोपासण्यासाठी ते वृद्धिंगत करण्यासाठी पती आणि पत्नीने एकत्र राहायला हवं. सतत वेगळं राहण चांगल्या नात्यासाठी घातक आहे. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने निष्कर्ष काढला आहे की, पत्नीची एकत्र कुटुंबात तसेच पतीबरोबर राहण्याची इच्छा दिसत नाही. महिलेने तिचं वैवाहिक कर्तव्य पार पाडलेलं दिसत नाही. तसेच तिने तिच्या पतीला आपल्या मुलाला भेटण्यास मज्जाव केला. पतीला तिच्या पितृत्वापासून वंचित ठेवलं. पतीने त्याच्या पत्नीला आनंदी ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. परंतु, पत्नी त्याच्याबरोबर राहण्याच्या मनःस्थितीत नाही. त्यामुळे हे न्यायालय पतीचा घटस्फोट अर्ज मंजूर करत आहे.