Delhi High Court on Baba Ramdev Patanjali Chyawanprash : योग गुरू रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेद या कंपनीला दिल्ली उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. न्यायालयाने पतंजली च्यवनप्राशच्या जाहिरातीचं प्रसारण तीन दिवसांच्या आत थांबवण्याचे आदेश दिले आहेत. या जाहिरातीमध्ये रामदेव यांनी इतर कंपन्यांच्या च्यवनप्राशना धोका (फसवणूक) म्हटलं होतं. त्यामुळे डाबर इंडिया लिमिटेडसह च्यवनप्राश बनवणाऱ्या इतर कंपन्यांनी पतंजलीच्या जाहिरातीविरोधात न्यायालयाचं दार ठोठावलं होतं.

डाबर इंडिया लिमिडेट आणि इतर विरुद्ध पतंजली आयुर्वेद लिमिडेट या खटल्याप्रकरणी मंगळवारी (११ नोव्हेंबर) दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. या खटल्याची सुनावणी करताना न्यायमूर्ती तेजस कारिया यांनी पंतजली कंपनी, सोशल मीडिया कंपन्या, ऑव्हर दी टॉप (ओटीटी) प्लॅटफॉर्म्स आणि इतर प्रसारकांना तीन दिवसांत पतंजली च्यवनप्राशच्या जाहिराती थांबवण्याचे आदेश दिले आहेत.

न्यायालयाने काय आदेश दिले आहेत?

बार अँड बेंचच्या अहवालानुसार न्यायमूर्ती कारिया यांनी त्यांच्या आदेशात म्हटलं आहे की “पतंजली कंपनीने राष्ट्रीय स्तरावरील वाहिन्या (नॅशनल टेलिव्हिजन चॅनेल्स), ओव्हर दी टॉप प्लॅटफॉर्म्स (ओटीटी) किंवा इतर कोणतेही स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्स अथवा स्ट्रीमिंग सिस्टिम, प्रिंट मीडिया, वर्ल्ड वाइड वेब तथा इंटरनेट प्लॅटफॉर्म्स, वर्तमानपत्रे आणि त्यांच्या सर्व सोशल मीडिया अकाउंट्ससह सर्व इलेक्ट्रॉनिक माध्यमांमधून वादग्रस्त जाहिरात काढून टाकावी, ब्लॉक करावी.”

डाबर इंडिया लिमिटेड कंपनीने काय आरोप केले आहेत?

डाबर इंडिया लिमिटेड या कंपनीने दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयाच्या एकल खंडपीठाने जाहिराती हटवण्याचे आदेश दिले आहेत. या याचिकेत डाबर इंडियाने आरोप केला होता की “पतंजलीच्या ‘स्पेशल च्यवनप्राश’ची जाहिरात नुकतीच दूरचित्रवाण्या व समाजमाध्यमांवर प्रसारित झाली आहे. ही जाहिरात अपमानास्पद व अयोग्य आहे. या जाहिरातीत रामदेव हे ग्राहकांना इशारा देत आहेत की च्यवनप्राशच्या नावाखाली बहुतेक लोकांची फसवणूक केली जात आहे. जाहिरातीत इतर च्यवनप्राश ब्रँड्सना धोका (फसवणूक) म्हटलं आहे. तसेच पतंजलीच्या च्यवनप्राशला आयुर्वेदाची खरी शक्ती लाभल्याचा दावा केला होता. आयुर्वेदाची शक्ती असलेलं हे एकमेव प्रामाणिक उत्पादन आहे असंही रामदेव यांनी म्हटलं आहे. याविरोधात डाबरने उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता.

डाबरने आरोप केला आहे की पतंजलीने जाणून बुजून त्यांचं प्रमुख उत्पादन असलेल्या डाबर च्यवनप्राशचं बाजारातील वर्चस्व मोडून काढण्यासाठी हा खोडसाळपणा केला आहे. डाबर कंपनी १९४९ पासून भारतात च्यवनप्राश विकत असून डाबरकडे बाजारातील ६१ टक्के हिस्सेदारी आहे.