उत्तर दिल्लीतील सिव्हिल लाईन्स परिसरात काही दिवसांपूर्वी एका पादचाऱ्याला गाडीने उडवणाऱ्या अल्पवयीन मुलाच्या पालकांचा निष्काळजीपणा या अपघाताला कारणीभूत ठरल्याची माहिती समोर आली आहे. या अल्पवयीन मुलाच्या वडिलांना काही दिवसांपूर्वी पोलिसांनी गुन्ह्यात मदत केल्याप्रकरणी अटक केली होती. फेब्रुवारी महिन्यात या मुलाने दुसऱ्या गाडीवर धोकादायकरित्या स्वत:ची गाडी ठोकली होती. यानंतर पोलिसांनी ३ मार्चला मुलाच्या वडिलांना धोकादायक गाडी चालवल्याप्रकरणी नोटीस बजावली होती.
अपघातानंतर पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या कुटुंबातील एकाने या अपघाताची जबाबदारी स्वीकारली होती. सिद्धार्थ शर्मा (वय ३२) असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. सिव्हिल लाईन्स भागात रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने आलेल्या मर्सिडीजने त्याला उडवले. स्थानिकांनी लगेचच तरुणाला रुग्णालयात दाखल केले. पण उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला होता. शर्मा काम संपवून बाजारातून काही वस्तू आणण्यासाठी निघाला असताना हा अपघात झाला. अपघातानंतर मंगळवारी सकाळी अल्पवयीन मुलाच्या कुटुंबातील एकाने आपल्या हातून हा अपघात झाल्याचे पोलीस ठाण्यात येऊन सांगितले. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याला पोलीस ठाण्यातच रडू कोसळले. अपघाताची जबाबदारी स्वीकारण्यासाठी आपल्यावर दबाव टाकण्यात आला होता, असे त्याने पोलिसांना सांगितले होते.