संपूर्ण देशात आज रक्षाबंधनचा सण साजरा होत आहे. बहिणी भावांना भेटायला जात आहेत. कौटुंबिक सणाच्या या मुहूर्तावर दिल्लीत मात्र एक धक्कादायक घटना घडली आहे. दिल्लीच्या करवाल नगरमध्ये एका व्यक्तीने त्याच्या पत्नीसह दोन चिमुकल्या मुलींची राहत्या घरी हत्या केली आहे. या घटनेनंतर आरोपी प्रदीप फरार झाला आहे.
मृत महिलेचे नाव जयश्री (२८) असे आहे. तर सात आणि पाच वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींनाही जन्मदात्या बापाने क्रूरपणे संपवले. मिळालेल्या माहितीनुसार, प्रदीप जवळच असलेल्या आझादपूर मंडईत भाजी विकण्याचे काम करतो. मृत जयश्रीचा भाऊ चंद्रभानने पोलिसांना सांगितले की, प्रदीपला जुगार खेळण्याचा नाद होता. तसेच तो पत्नीला नेहमी मारझोडही करायचा.
पोलिसांनी सदर गुन्ह्याची माहिती देताना सांगितले की, घटनास्थळी पोहोचल्यानंतर २८ वर्षीय महिला आणि दोन लहान मुलींचा मृतदेह आढळून आला. फॉरेन्सिक पथक आणि पोलीस घटनास्थळावरून पुरावे गोळा करण्याचे काम करत आहेत. तसेच मृतांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे. घरगुती भांडणातून प्रदीपने हा गुन्हा केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. शेजाऱ्यांनीही पती-पत्नीमध्ये नेहमी भांडणे होत असल्याचे म्हटले आहे.
करवाल नगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला आहे. तसेच आरोपी प्रदीपला अटक करण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत.
दिल्लीत आणखी एक गुन्हा
दिल्लीतील नंद नगरी येथे काल रात्री गोळीबाराची घटना घडली. या गोळीबारात कपिल नावाच्या २८ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. हत्या करणाऱ्या शिवम यादव नामक तरूणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चौकशीदरम्यान शिवमने सांगितले की, कपिल आणि त्याच्या बहिणीचे प्रेमसंबंध होते. ही बाब त्याला मान्य नसल्यामुळे त्याने कपिलला बहिणीपासून दूर राहण्यास धमकावले. यावेळी त्याने देशी बनावटीच्या पिस्तुलीतून गोळीबार केला. ज्यात कपिलचा मृत्यू झाला.