प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला अपहरण झालेल्या मुलाची तब्बल आठवडाभरानंतर सुटका करण्यात आली. पोलीस आणि अपहरणकर्त्यांमध्ये चकमकही झाली असून यात एका अपहरणकर्त्याचा मृत्यू झाला आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत कडेकोट बंदोबस्त असतानाही शाहदरा येथे दुचाकीवरून आलेल्या दोघांनी स्कूल बसच्या चालकावर गोळी झाडून एका मुलाचे अपहरण केले होते. गुरुवारी ही घटना घडली होती. स्कूल बसमध्ये २० ते २२ विद्यार्थी प्रवास करत होते. अपहरण झालेल्या मुलाची बहीणही त्याच बसमध्ये प्रवास करत होती. तिच्यासमोरच त्या मुलाला उचलून नेण्यात आले होते.
दोन दिवसांनी अपहरणकर्त्यांनी मुलाच्या पालकांना फोन करुन ६० लाख रुपयांची खंडणी देखील मागितली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून दिल्ली पोलीस आयुक्त अमूल्य पटनायक यांनी या प्रकरणाचा तपास शाहदरा पोलिसांकडून क्राईम ब्रँचकडे वर्ग केला. गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज आणि तंत्रज्ञानाच्या आधारे तपास करत आरोपींचा शोध घ्यायला सुरुवात केली. रवी आणि नितीन या दोघांनी त्या मुलाचे अपहरण केले होते आणि एका भाड्याच्या खोलीत त्यांनी मुलाला डांबून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सर्वप्रथम पोलिसांनी अपहरणकर्त्यांना माहिती पुरवणाऱ्याला ताब्यात घेतले. त्याच्या मार्फत पोलीस अपहरणकर्त्यांपर्यंत पोहोचले. पोलीस घटनास्थळी पोहोचताच अपहरणकर्त्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात रवीचा मृत्यू झाला. तर नितीन तिथून पळून जाण्यात यशस्वी ठरला. दोघेही सराईत गुन्हेगार असल्याची माहिती समोर येत आहे. मुलगा सुखरुप असून त्याला आईवडिलांकडे सोपवण्यात आले, अशी माहिती पोलिसांनी दिली.