हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवल्यानंतर बुधवारपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. दिल्लीमध्ये अनेक ठिकाणी पाणी तुंबलं आहे. आजही (गुरुवार) दिल्लीमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसाचा फटका खासदार छत्रपती संभाजीराजे यांना देखील बसला आहे. ५९ लोधी इस्टेट येथील संभाजीराजे यांच्या बंगल्यात पावसाचं पाणी शिरल आहे.

लोधी इस्टेट हा खासदारांच वास्तव्य असलेला व्हीआयपी परिसर आहे. मात्र याठीकाणी सुद्धा दोन दिवसाच्या पावसाने थैमान घातले आहे. खासदार संभाजीराजेंच्या बंगल्यामध्ये बेडरुम, किचनसहीत सगळीकडे पाणी शिरलं आहे. राष्ट्रपतींच्या भेटीसाठी संभाजीराजे मध्यरात्री दिल्लीत पोहचले. पण त्यांनाही कालची रात्र ही पाण्यातचं काढावी लागली.

संभाजीराजे म्हणाले, “काल मध्यरात्री दिल्लीत पोहचलो. तेव्हा पाऊस नव्हता. दोन दिवसांपासून पाणी शिरंल आहे. पहाटे ६ वाजता पुन्हा पाणी शिरल्यामुळे सर्वांची पळापळ सुरु झाली. खालून ड्रनेजमधून हे पाणी आत शिरलं. त्यामुळे हॉलमध्ये सोफ्यावर रात्री काढावी लागली. दिल्लीतील हा पहिलाचं अनुभव आहे.” संभाजीराजे एबीपी माझा सोबत बोलत होते.

देशात सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस

भारतात यावर्षी कमी -अधिक प्रमाणात मान्सून बरसत आहे. हवामान खात्याच्या मते, भारतात सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडू शकतो. नवी दिल्लीतील हवामान विभागाने बुधवारी भारतात सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे जुलै आणि ऑगस्टमध्ये अपुऱ्या पावसाचा सामना करणाऱ्या लाखो शेतकऱ्यांना मदत होईल असे म्हटले आहे. जून महिन्यात सरासरीपेक्षा १० टक्के जास्त मान्सून पाऊस झाला असून ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा २४ टक्के कमी पावसाची नोंद झाल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाचे (आयएमडी) महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. हवामानाच्या महत्त्वाच्या मापदंडांनुसार यावर्षी सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. मान्सूनची तूट आता ९ टक्क्यांवर आली आहे आणि सप्टेंबरमध्ये चांगल्या पावसामुळे ती आणखी कमी होऊ शकते. ऑगस्टपूर्वी जूनमध्येही सात टक्के कमी पावसाची नोंद झाली होती, असे महापात्रा यांनी म्हटले.