शुक्रवारी रात्री दिल्लीत झालेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपी शिवकुमार यादवला मथुरा येथून ताब्यात घेण्यात आले आहे. तत्पूर्वी दिल्ली पोलिसांनी यादव याचा ठावठिकाणा सांगणाऱ्या व्यक्तीस एक लाखांचे इनामही जाहीर केले होते. दरम्यान, या प्रकरणी अमेरिकास्थित टॅक्सी कंपनीला नोटीस पाठविण्यात आली आहे, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली.
एक २७ वर्षीय पीडित तरुणी आपले कार्यालयीन काम उरकून शुक्रवारी सायंकाळी सात वाजता मित्रांसह भोजनासाठी बाहेर गेली होती. तिच्याच एका मित्राने तिला वसंतविहार परिसरापर्यंत सोडले. त्यानंतर आपल्या इंद्रलोक परिसरातील घरापर्यंत जाण्यासाठी तिने उबेर या खासगी कंपनीची टॅक्सी पकडली. मात्र प्रवासादरम्यान तिचा डोळा लागला. जेव्हा तिला जाग आली तेव्हा एका निर्जन परिसरात टॅक्सी आल्याचे आणि टॅक्सीचे सगळे दरवाजे बंद करण्यात आल्याचे तिच्या लक्षात आले. तिने मदतीसाठी आरडाओरडा केला असता टॅक्सीचालकाने खाली पाडले आणि आपल्यावर बलात्कार केला, अशी तक्रार तिने पोलीस ठाण्यात नोंदविल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली. सदर आरोपीने आपल्याला आपल्या घराजवळ आणून सोडले, मात्र पोलिसांकडे तक्रार करण्याचा प्रयत्न केल्यास जिवे मारण्याची धमकीही दिली, असेही पीडित महिलेने तक्रारीत म्हटले आहे.
शिवकुमार यादव (वय ३२) असे सदर वाहनचालकाचे नाव असून तो मथुरा येथील रहिवासी आहे. अमेरिकास्थित टॅक्सी कंपनी ‘उबेर’लाही या प्रकरणाच्या तपासासाठी सहकार्य करण्याविषयी आदेश देणारी नोटीस दिल्ली पोलिसांनी धाडली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delhi rape case uber cab driver arrested in mathura says police
First published on: 08-12-2014 at 04:03 IST