Delhi Blast Case Who is Dr. Shaheen Saeed: दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ १० नोव्हेंबर रोजी झालेल्या स्फोटानंतर तपास यंत्रणांनी देशभरात कारवाई सुरू केली. याचाच भाग म्हणून ४६ वर्षीय डॉक्टर शाहीन सईद यांनाही पाकिस्तानी दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. जैश-ए-मोहम्मदची महिला शाखा स्थापन करून त्याद्वारे महिलांचे नेटवर्क उभे करत असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. हरियाणाच्या फरीदाबादमधील अल-फलाह वैद्यकीय महाविद्यालयात रोजची नोकरी केल्यानंतर दुपारी चार वाजल्यानंतर त्या वेगळे काम करायच्या, असे त्यांच्या सहकाऱ्यांनी आता सांगितले आहे.

तपासाशी संबंधित असलेल्या एका अधिकाऱ्याने एनडीटीव्हीशी बोलताना सांगितले की, डॉ. शाहीन यांच्याकडे एक जपमाळ आणि हदीस पुस्तक (पैगंबर मुहम्मद यांच्या शिकवणींचा संग्रह) सापडले आहे. डॉ. शाहीन यांच्याबद्दल माहिती देत असताना त्यांच्या सहकाऱ्याने सांगितले की, डॉक्टर सईद विचित्र वागत असत. त्या संस्थेच्या नियमांचे पालन करत नसत. त्या कुणालाही न सांगता निघून जात.

नॅशनल असेसमेंट अँड ॲक्रेडिटेशन काऊन्सिल अर्थात नॅकने लाल किल्ल्याजवळ झालेल्या हल्ल्यानंतर फरीदाबादमधील अल-फलाह संस्थेला नोटीस बजावली असली तरी संस्थेने मात्र स्वतःला या हल्ल्यापासून दूर ठेवले आहे. तसेच राष्ट्राच्या सुरक्षेसाठी वचनबद्धतेचे आश्वासन देत तपासात सहकार्य करण्याची भूमिका मांडली आहे.

कोण आहे डॉ. शाहीन सईद

लखनौच्या कैसरबाग येथील मुळच्या डॉ. शाहीन यांनी १९९६ ते २००५ या काळात अलाहाबादच्या (आता प्रयागराज) महाविद्यालयातून एमबीबीएस आणि एमडीचे शिक्षण घेतले. वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली. कानपूरच्या गणेश शंकर विद्यार्थी मेमोरियल मेडिकल कॉलेजमध्ये त्या सहाय्यक प्राध्यापक म्हणून रुजू झाल्या.

टाइम्स ऑफ इंडियाने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, प्रयागराजमधील वास्तवादरम्यान डॉ. शाहीन संयमी स्वभावाची होती. हरियाणाच्या फरीदाबादमधील अल-फलाह विद्यापीठात काम करत असताना त्यांचा संबंध कट्टरपंथीयांशी झाला असावा, असा संशय तपास यंत्रणांना येत आहे. जैश-ए-मोहम्मदचे फरिदाबाद मॉड्यूल उद्ध्वस्त केल्यानंतर पोलिसांनी डॉक्टर शाहीन शाहीदला अटक केली आहे.

तपासादरम्यान पोलिसांनी डॉक्टर शाहीनच्या कारमधून एके ४७ रायफल, एक पिस्तूल, जिवंत काडतुसे आणि इतर स्फोटक साहित्य जप्त केले. डॉ. शाहीनने भारतात ‘जमात-उल-मोमिनात’ नावाची महिलांची संघटना स्थापन केल्याचा आरोप करण्यात येत आहे. ही संघटना जैश-ए-मोहम्मदची महिला शाखा मानली जाते.

डॉ. शाहीन यांनी कानपूर येथील नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. जफर यांच्याशी लग्न केले होते. परंतु २०१५ मध्या त्यांचा घटस्फोट झाला. विभक्त झाल्यानंतर त्या एकटच्या घरी राहत होत्या. तसेच स्वतःच्या कुटुंबियांशीही त्यांचा मर्यादित संपर्क होता.