Delhi Red Fort Car Blast: दिल्लीतील लाल किल्ल्याच्या बाहेर असलेल्या मेट्रो स्टेशनच्या बाहेर सोमवारी संध्याकाळच्या सुमारास एका कारमध्ये मोठा स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. या स्फोटानंतर दिल्लीसह देशातील अनेक भागांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. या कारच्या स्फोटानंतर जवळपासची काही वाहने देखील जळून खाक झाली आहेत. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, हा स्फोट इतका भीषण होता की यामुळे परिसरातील रस्त्यावरील दिवे देखील बंद झाले.
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ काय झाले?
सोमवारी (१० नोव्हेंबर २०२५) संध्याकाळी ६ वाजून ५५ मिनिटांनी जुन्या दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या बाहेर एका कारमध्ये स्फोट झाल्याची माहिती मिळाली. या स्फोटामुळे अनेक वाहनांना आग लागली. प्राथमिक अहवालानुसार, या घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाले आहेत.
नेमका स्फोट कुठे झाला?
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील लाल किल्ला मेट्रे स्टेशनच्या गेट नंबर १ च्या बाहेर हा स्फोट झाला. हे ठिकाण दिल्ली गेटला काश्मिरी गेटशी जोडणाऱ्या रस्त्यावर असून हा परिसर चांदणी चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या अगदी जवळ आहे. हा जामा मशिदीपासून सुमारे १.५ किलोमीटर अंतरावर असलेला अत्यंत गजबजलेला भाग आहे. जुन्या दिल्लीतील अत्यंत गर्दीच्या ठिकाणी सोमवारी संध्याकाळी ही घटना घडल्याने याचे गांभीर्य वाढले आहे.
घटनास्थळावरील सध्याची परिस्थिती काय आहे?
स्फोटाच्या ठिकाणी अग्निशमन दलाची वाहने आणि दिल्ली पोलीस स्पेशल सेलच्या अधिकाऱ्यांसह पोलीस पथके दाखल झाली आहेत. तसेच जखमींना एलएनजेपी रुग्णालयात नेण्यात आले आहे.
किती जणांचा मृत्यू?
या घटनेत मृत्यू झालेल्या नागरिकांची संख्या वाढली असून किमान ८ जणांचा या घटनेत मृत्यू झाला आहे. तर इतर १२ जण जखमी झाले आहे.
अमित शाहांची पोलीस आयुक्तांशी चर्चा
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या स्फोटाच्या घटनेनंतर तात्काळ दिल्ली पोलीस आयुक्तांशी चर्चा केला. एनएसजी (NSG), एनआयए (NIA), आणि फॉरेन्सिक विभागाचे पथक तातडीने घटनास्थळी रवाना करण्यात आले आहेत. दिल्लीतील या घटनेसंदर्भात गृहमंत्री आयबी संचालकांच्या (IB Director) सतत संपर्कात आहेत, असे वृत्त एएनआयने दिले आहे.
