Delhi Red Fort Blast Eyewitnesses Recall Incident : दिल्लीमधील लाल किल्ला मेट्रो स्थानकाच्या गेट नंबर १ जवळ उभ्या कारमध्ये मोठा स्फोट झाल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या स्फोटामुळे आजूबाजूला उभ्या गाड्यांनी पेट घेतला. स्फोटानंतर सहा कार, चार मोटारसायकली आणि तीन ई-रिक्षा पेटल्या. या स्फोटामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या स्फोटात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, या स्फोटामुळे दिल्लीसह मुंबई शहरात हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.

स्फोट झाला त्या परिसरात जॅकेट विकणाऱ्या शमीम या प्रत्यक्षदर्शीने दी इंडियन एक्सप्रेसला सांगितलं की “स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की परिसरातील इमारती हादरल्या. आम्ही हा स्फोट पाहून खूप घाबरलो. स्फोटानंतर आगीचा एक गोळा आकाशात जाताना आम्ही पाहिलं.”

कारचे तुकडे हवेत उडताना पाहिलं : प्रत्यक्षदर्शी

या स्फोटानंतर एक प्रत्यक्षदर्शी अनुज याने सांगितलं की “मी माझं नेहमीचं भांडी धुण्याचं काम करत होतो. तेवढ्यात स्फोट झाला. कारचे अनेक भाग हवेत उडताना आम्ही पाहिलं. मी स्फोट झाला त्या जागेपासून केवळ पाच मीटर अंतरावर मी उभा होतो. सुदैवाने मी वाचलो. मी जिवंत आहे याबद्दल देवाचे आभार.

“आम्ही बरेच जण स्फोट झाला त्या दिशेने धावलो. आम्ही एक कार जळताना पाहिली. अनेक जण मदतीसाठी ओरडत होते. तेवढ्यात पोलिसांची एक कार तिथे आली. पोलिसांनी आम्हाला मागे सरकण्यास सांगितलं.”

“मानवी शरीरांच्या चिंधड्या उडाल्या, ती कार…”

जवळच्या नेताजी सुभाषचंद्र बोस मार्गावर छोले भटुरे व फळांचा रस विकणारे प्रेम शर्मा (३८) म्हणाले, “ज्या कारमध्ये स्फोट झाला ती कार माझ्यासमोरच उभी होती. मी रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला होतो. मी भटुरे तळत होतो तेवढ्यात एक मोठा स्फोट झाला. स्फोटानंतर एक कार जळताना दिसत होती. आमच्या स्टॉलवर काम करणारा एक कामगार यात होरपळला आहे. स्फोटामुळे आमचा स्टॉल उलटला. मी स्फोट झाला त्या दिशेने पाहिलं तेव्हा मी मानवी शरीराच्या चिंधड्या होऊन त्या हवेत उडताना पाहिल्या. हे दृष्य पाहून मी तिथून पळालो. मेट्रो स्टेशनच्या मागे जाऊन लपलो. पोलीस तिथे आल्यानंतरच मी बाहेर आलो.